सोलापूर मध्य : मुस्लीम उमेदवार न दिल्याने महाआघाडीवर नाराजी

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 22 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात एकूण २८ पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ हे मुस्लिम बहूल आहेत. या मतदारसंघांमध्ये तीस टक्के पेक्षा अधिक मुस्लिम मतदान आहे. परंतु आजपर्यंत याठिकानच्या मुस्लिम प्रश्नांकडे कोणत्याही राजकीय नेत्याची नजर गेली नसल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आवाज मराठीची टीम विविध मंतदारसंघांचा दौरा करत आहे. या निमित्ताने आवाज मराठीची टीम सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पोहचली होती. यावेळी त्यांनी मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आणि इतर मुस्लिम प्रश्नांचा आढावा घेतला.  

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबद्दल...... 
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून कॉँग्रेसचा गड राहीला आहे. याठिकाणी ३१ % मतदार मुस्लिम असल्याने हा मतदारसंघ मुस्लिम बहूल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. गेल्या १५ वर्षांपासून याठिकाणी कॉँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार राहिल्या आहेत. राज्यशास्त्राचे अभ्यासक मोहसीन पठाण मतदारसंघाबद्दल सांगताना म्हणतात,  “ सोलापूर शहर मध्य हा बहुसांस्कृतिक मतदारसंघ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम भाषिक नंतर तेलगू, कन्नड, मराठी आणि उर्दू भाषिक लोक राहतात. मुस्लिम मतांची टक्केवारी जास्त असल्यामुळे या मतदारसंघात मुस्लिम मतांचा प्रभाव दिसतो. ” नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकभेतून प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. 
 
मुस्लिम मतदार आणि प्रतिनिधित्व 
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पूर्वीपासून कॉँग्रेसची एकहाती सत्ता होती. मुस्लिम बहूल मतदारसंघ असून देखील विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला नाही. २००९ पासूनच्या निवडणुकीत कॉँग्रेस विरोधात असलेल्या मुस्लिम उमेदवारांनी चांगली मते याठिकाणी घेतली परंतु ते विजयापासून लांब राहिले. यावर बोलताना मोहसीन पठाण म्हणतात, “ सातत्याने या मतदारसंघात प्रमुख पक्षांकडून मुस्लिमांना उमेदवारी डावलण्यात आली आहे. तरीदेखील मुस्लिम समाजाने कॉँग्रेस पक्षाला भरभरून मते दिली आहेत. लोकसभा निवडणुकीतदेखील मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचे पहायला मिळाले. मात्र अलीकडच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कॉँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचे अंतर कमी कमी होत आहे. एमआयएम सारखा पक्ष याठिकाणी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत आहे. मुस्लिमांची मते  एमआयएमच्या उमेदवाराला  मिळत आहे. आगामी निवडणुकीत  एमआयएमचा उमेदवार याठिकाणी जिंकेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ” 

याविषयी बोलताना त्याठिकाणचे स्थानिक रहिवासी आफताब सय्यद म्हणतात,  " मतदानाप्रमाणेच प्रतिनिधीत्वचा अधिकार देखील संविधानाने सर्वांना दिलेला आहे.  देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी लोकसंख्या मुस्लिम समाजाची आहे.  परंतु देशाला स्वातंत्र्य मिळवून ७८ वर्ष झाली तरी देखील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अगदी बोटावर मोजण्याइतके आहे. आजपर्यंत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेच्या प्रतिनिधीत्वात मुस्लिम प्रतिनिधित्व एका कार्यकाळात दोन आकडी संख्येच्या पुढे जावू शकले नाही. ” 

प्रणिती शिंदे यांच्या लोकसभेतील विजयानंतर सोलापूर शहर मध्यची जागा रिक्त झाली. यावेळी मतदारसंघातील कॉँग्रेसच्या मुस्लिम नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी ही जागा आम्हाला मिळावी अशी आग्रहाची मागणी कॉँग्रेसकडे केली होती. परंतु या मागणीला काहीही उत्तर न देता कॉँग्रेसने दूसरा उमेदवार याठिकाणी दिल आहे. यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. मुस्लिम समाजाच्या जीवावर कॉँग्रेस निवडून येत असल्याचे स्थानिक सांगतात. 

मुस्लिमांचे प्रश्न राजकीय डोळ्यातून दुर्लक्षित 
मुस्लिम समाजाचे मतदान घेतले की त्यांच्या प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. राजकीय डोळ्यातून त्यांचे  प्रश्न नेहमीच सुटतात. यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मुस्लिम समाज ‘को सो दूर हे’ असे म्हणावे लागते. मुस्लिमांच्या प्रश्नांवर लक्ष वेधताना मोहसीन पठाण म्हणतात, “ इतर समजासारखेच मुस्लिमांचे देखील प्रश्न आहेत. मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण चिंताजनक आहे. तसेच मुस्लिमांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. कोर्टाने शिक्षण आणि नोकरीत दिलेल्या पाच टक्के आरक्षणाबाबत कोणताही लोकप्रतिनिधि बोलत नाही.  याठिकानचे मुस्लिम बांधव छोटा-मोठा व्यवसाय करून उपजीविका करतात.  त्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचे त्यांचे प्रश्न आहेत. ”

समाजातील काही घटकांकडून मुस्लिमांना धार्मिक चक्रव्हूहात अडकवण्याचा प्रयत्न होतो. यामुळे अलीकडे मुस्लिम समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणीही मुस्लिम समाजाच्या बाजूने बोलत नसल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुस्लिम व्यक्ति मतदान करताना करतो ‘हा’ विचार 
मुस्लिम हा वोट जिहाद करतो असा समाजातील काही घटकांमध्ये पूर्वग्रह आहे. याविषयी बोलताना ते म्हणतात, “ कोणताही समाज हा एककली होऊन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या मागे उभा राहत नाही. तसेच तो मतदानदेखील करत नाही. असे असते तर मुस्लिम बहूल मतदारसंघात मुस्लिम सोडून इतर कोणीही निवडून येऊ शकले नसते; हे आपण समाजातील घटक म्हणून समजून घ्यायला पाहिजे. उमेदवाराच्या वर्तणानुसार मतदार वागत असतो. या सर्व बाबी मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिति ठरवत असते. ” 

राजकीय नेतेमंडळींनी मुस्लिमांच्या मतांचे राजकारण न करता त्यांना योग्य प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे.  मुस्लिमांच्या प्रश्नांना वाचा फोडणे गरजेचे आहे. तरच येत्या काळात मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसेल. 

एमआयएमच्या फारुक शाब्दी यांच्याकडे सर्वांच्या नजरा
फारूक शाब्दी हे एमआयएमचे सोलापूरचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. एमआयएमकडून त्यांना सोलापूर शहर मध्य विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी,  ‘माझे भाग्य आहे आणि सोलापूरकरांचे प्रेम आहे’ अशा शब्दात भावना व्यकत  केल्या होत्या. मागील विधानसभा निवडणुकीतही फारूक शाब्दी यांनी एमआयएमकडून शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक  लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत येथे एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाची ३७ हजार १३८ तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची ३८ हजार ७२१ मते मिळाली होती.  

माध्यमांशी बोलताना फारूक शाब्दी म्हणाले,  “ गेल्या दोन निवडणुकांमध्ये एमआयएमने दमदार कामगिरी केली आहे. यावेळी विजयी झेंडा फडकवणारच. गेल्या पाच वर्षात आम्ही या मतदारसंघात काम केले आहे. काम करत असताना सर्व जाती-धर्माला सोबत घेतले आहे. या कामाची पोचपावती म्हणून सोलापूर शहर मध्यमधील मतदार यावेळी आम्हाला नक्कीच देतील, असा विश्‍वास आहे. ” 

१९ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे 
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून १९ उमेदवारांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले. यावेळी गौस कुरेशी, युसूफखान बशीर अहमद पठाण, सादिक अली फारुक शेख, मुस्तफा मकबुल शाब्दी, सादिक महबूब नदाफ, संतोष येमूल, अबुहुरेरा सय्यद, शिवराज गायकवाड, मनीष काळजे, अशोक बोकीवाले, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, शौकत पठाण, अंबादास गोरंटला, श्रीदेवी फुलारे, नागेश पासकंटी, रघुरामुलू कंदिकटला, श्रीनिवास संगा, प्रमोद गायकवाड या उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 

'हे' उमेदवार गाजवणार विधानसभेची निवडणूक 
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात कोणते उमेदवार असणार याचे चित्र कालच्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमुळे स्पष्ट झाले आहे. काही अपक्ष आणि बंडखोर मिळून एकूण १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ही निवडणूक २० उमेदवार लढवत आहेत. यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होणार आहे. 

यामध्ये देवेंद्र कोठे (भाजप), चेतन नरोटे (काँग्रेस), फारुक शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप) या उमेदवारांशिवाय प्रा. डॉ. सुभाष गायकवाड (बसप), खिझार पिरजादे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मनीष कोमटी (राष्ट्रीय जनमंच सेक्युलर), योगेश शिदगणे (बहुजन मुक्ती पार्टी), रविकांत बनसोडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), श्रीनिवास संगेपांग (वंचित बहुजन आघाडी) यांच्याशिवाय तौफिक शेख, दत्तात्रय थोरात, देविदास दुपारगुडे, प्रदीप सर्जन, मनीष गायकवाड, रवी म्हेत्रे, ॲड. रोहित मोरे, विक्रम कसबे, सैपन शेख, डॉ. संदीप आडके हे उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter