उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी बुधवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची तुफान गर्दी दिसून आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच दोन लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर बुधवारी १ जानेवारीला अर्थात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या संख्येत आणखी भर पडून सुमारे ३ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच सूर्योदयावेळी रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये हा उत्साह दिसून आला.
यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, "संपूर्ण जग ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरं करत आहे. हिवाळी हंगाम अन् सुट्ट्यांमुळं भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. कारण या काळात शाळा, न्यायालये आणि शेतीची कामं बंद असतात. या काळात लोक अनेकदा सुट्ट्या घेतात. पण यंदा गोवा, नैनिताल, शिमला किंवा मसुरी यांसारख्या पारंपारिक पर्यटन स्थळांऐवजी सुट्टी घालवण्यासाठी अयोध्या हे प्रमुख ठिकाण बनलं आहे"
अयोध्या शहर प्रशासनानं राम भक्तांनी केलेल्या या तुफान गर्दीचं नियोजन करण्यासाठी लोकांना शहरातील अनेक विभाग आणि झोनमध्ये विभाजित केलं होतं. या गर्दीच्या नियंत्रणासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर इथं वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले होते. तसंच चोवीस तास वाहनांची तपासणी करण्यात येत होती, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
नववर्षाच्या एक दिवस आधीच भाविकांची इथं गर्दी व्हायला लागली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन पूर्ण केलं होतं. त्यांनी राहण्यासाठी हॉटेल्स, धर्मशाळा आणि होमस्टे पूर्णपणे बुक झाले होते, कारण स्थानिक आणि बाहेरचे असे दोन्ही पर्यटक या शहरात आले होते. असंच दृश्य हनुमानगढी मंदिरातही दिसून आलं. या ठिकाणी पहाटेच्या आरतीपासून संध्याकाळच्या आरतीपर्यंत ही गर्दी स्थिर होती. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी प्रशासनानं रामजन्मभूमी मार्गावर 10 अतिरिक्त अभ्यागत गॅलरी तयार केल्या होत्या. दर्शनासाठीच्या रांगेची संख्या 10वरून 20 पर्यंत वाढवली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
अयोध्येचे पोलीस उपाधीक्षक आशुतोष तिवारी पुढे म्हणाले की, शहराला सात सुरक्षा क्षेत्र आणि 24 झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात असून गर्दी टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतुकीच्या हालचालींवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात आले होते.