जम्मू-काश्मीरमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मोदरगम आणि चिन्नीगम या दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला प्राप्त झाली होती. दहशतवाद्यांविरोधात शनिवारी शोध मोहीम सुरू असतानाच रात्री चकमक झाली. या चकमकींमध्ये जवानांनी सहा दहशतवाद्यांना ठार मारले. यावेळी दोन जवानही शाहिद झाले. त्यातील एक जवान अकोला तालुक्यातील आहे. 


जवानांनी केलेल्या गोळीबारात मोदरगम येथे दोन तर चिन्नीगम येथे चार दहशतवाद्यांना मारण्यात जवानांना यश आले. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. आज एकाच दिवसांत सहा दहशतवाद्यांना मारल्याने या मोहिमेत मोठे यश मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘सुरक्षा दलांच्या यशामुळे जम्मू-काश्‍मीरमधील वातावरण सुरक्षित होत असून सामान्य जनताही दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. यामुळे मोहिमांना वेगही येत आहे,’ असे पोलिस महासंचालिका रश्‍मी स्वेन यांनी सांगितले.

अकोल्यातील जवान शहिद 
या चकमकींमध्ये हुतात्मा झालेल्या दोन जवानांमध्ये एक जण महाराष्ट्रातील अकोल्यातील आहे. प्रभाकर जंजाल असे त्यांचे नाव असून चिन्नीगाम येथे दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज  अकोल्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter