आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीनिमित्त केली होती. या घोषणेला पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद केल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका, तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण कायम राहावी, यासाठी हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, शासनाने अधिकृत निर्णय जाहीर केला आहे.
या स्मारक उभारणीसाठी पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ व जाणकारांची एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या मार्गदर्शनाखाली स्मारकाच्या कामाला वेग दिला जाईल. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांसाठीची जबाबदारी पर्यटन विभागावर सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांची आग्रा येथून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांना करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांनी नजरकैदेत ठेवले होते. ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करणार असून, त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारले जाणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित संग्रहालय, दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) कार्यक्रम, माहितीपट आणि इतर उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे पर्यटकांना महाराजांच्या पराक्रमाची सखोल माहिती मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथील सुटका ही भारतीय इतिहासातील अभिमानास्पद घटना आहे. मात्र, आजतागायत या ठिकाणी कोणतेही स्मारक नव्हते. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेशी संबंधित ठिकाण विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यामुळे मराठी जनता तसेच संपूर्ण देशभरातील इतिहासप्रेमींना या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेता येईल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter