मुस्लिम महिलांना मतदानापासून रोखल्यामुळे सात पोलीस निलंबित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 2 h ago
मुस्लीम महिलांचे ओळखपत्र तपासताना महिला पोलीस
मुस्लीम महिलांचे ओळखपत्र तपासताना महिला पोलीस

 

उत्तर प्रदेशातील कुंदरकी विधानसभा मतदारसंघात काही मुस्लिम महिलांना मतदानापासून अडविण्याच्या प्रकार केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. झारखंडमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६७.५९ टक्के मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशसह पंजाबमधील चार व केरळमधील एका विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान पार पडले.

उत्तर प्रदेशातील नऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडले. यात गाझियाबाद, काटेहरी, खैर, कुंदरकी, करहलस, माझावान, मीरापूर, फूलपूर व सिसामाऊ या मतदारसंघांचा समावेश आहे. कुंदरकी या विधानसभा मतदारसंघात कुंदरकी मतदारसंघात मुस्लिम महिला आल्यानंतर त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांची तपासणी करीत होते. त्यामुळे अनेक महिलांना मतदानापासून रोखले जात होते. या प्रकाराची समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाने तक्रार केली. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचे महम्मद रिझवान उमेदवार आहे. या भागात मुस्लिम मतदारांचा प्रभाव असल्याचे मानले जात आहे. कोणत्याही व्यक्तीला मतदानापासून रोखता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाने पोलिसांना आणि प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुस्लिम महिलांची ओळख पटविण्याच्या प्रकारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यात कानपूर आणि मुझफ्फरपूर येथील प्रत्येकी दोन पोलिस अधिकारी आणि मोरादाबाद येथील तीन पोलिसांचा समावेश आहे.

या प्रकाराबद्दल समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. पोलिस बेकायदा मतदारांचे मतदान ओळखपत्र आणि आधार कार्डची तपासणी करीत होते. प्रशासनावर दबाव टाकून मतदान प्रभावित करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. परंतु हे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. या मतदारसंघात बुरखा घालून काही माणसे मतदान केंद्रावर येत असल्याची तक्रार असल्याने पोलिस तपासणी करीत होते, समाजवादी पक्षाने केलेल्या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही असा, दावा भाजपने केला आहे.