संजीव खन्ना बनले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 15 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली. राष्ट्रपतींच्या सल्ल्यानं केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून नियुक्तीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. मावळते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडं केली होती. येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रचूड हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी न्या. खन्ना सरन्यायाधिशपदाची शपथ घेतील.

यासंदर्भात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करत न्या. खन्ना यांची नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, “भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर न्या. खन्ना यांची नियुक्ती केल्याबद्दल आनंद होत आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील"

न्या.संजीव खन्ना हे सध्या सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत, ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. खन्ना यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे. 13 मे 2025 रोजी ते सेवानिवृत्त होतील, सध्या ते 64 वर्षांचे आहेत. आत्तापर्यंत सुमारे 275 खंडपीठांमध्ये संयुक्तरित्या त्यांनी निकाल दिले आहेत.

कोण आहेत संजीव खन्ना 
१४ मे १९६० रोजी संजीव खन्ना यांचा जन्म झाला. संजीव खन्ना गेल्या चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. १९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.

न्यायमूर्ती खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले आणि २००४ मध्ये दिल्लीच्या एनसीटी (सिव्हिल) विभागासाठीही वकिली केली. दिल्ली उच्च न्यायालयात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणूनही भूमिका बजावली.

२००५ साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ते २००६ साली न्यायमूर्ती म्हणून कायम झाले. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. न्या. संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. जून ते डिसेंबर २०२३ या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter