मनोज जरागे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेत मराठा-दलित-मुस्लिम एकत्रिकरणाची हाक दिली होती. यासाठी मौलाना सज्जाद नोमाणी यांच्यासह काही मुस्लिम धर्मगुरु, दलित नेते अंतरवाली सराटीत येऊनही गेले. पण मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत आता पाडापाडीची आणि काही ठिकाणी पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मौलाना सज्जाद नोमाणी यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा एमआयएमला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमआयएमने महाराष्ट्रातील १६ मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद पुर्व विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील पुर्व-पश्चिम आणि मध्य अशा तीनही मतदारसंघात आघाडी मिळाल्यामुळे एमआयएमचा आत्मविश्वास वाढला होता. यातून इम्तियाज जलील यांनी धुर्त खेळी करत स्वत पुर्वमधून उमेदवारी घेतली आणि नासेर सिद्दीकी यांना दुसयांदा मध्य मतदारसंघातून लढायला सांगितले.
इम्तियाज जलील यांच्या या प्रस्तावावर पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनीही होकार दिला. इम्तियाज जलील यांची खेळी यशस्वी ठरणार, दलित-मराठा-मुस्लिम समीकरण आणि मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर एमआयएम पुर्व-मध्यमध्ये चमत्कार घडवणार असे चित्र रंगवले जात होते. पण हा रंग बेरंग करण्याचे काम आधी वंचित बहुजन आघाडीने अफसर खान या लोकसभेतील प्रतिस्पर्ध्याला पुर्वमधून मैदानात उतरवत केला.
या शिवाय पुर्वमध्ये पंधरा मुस्लिम उमेदवार असल्याने एमआयएमची वोट बँक फोडण्याची रणनिती आखली गेली. यावर निवडणुक प्रचार संपण्याच्या चार दिवस आधी मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमाणी यांच्या कालच्या निर्णयाने शेवटचा घाव घातला, एमआयएममध्ये कार्याध्यक्ष आणि पुर्वमधून या पक्षाकडून दोन वेळा निवडणूक लढलेल्या आणि आता समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेल्या डॉ. गफ्फार कादरी यांना नोमाणी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी नोमाणी यांची भेट घालून देण्यात आणि दलित-मुस्लिम-मराठा एकत्रिकरणाच्या प्रयत्नात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इम्तियाज जलील यांचीच आता कोंडी करण्यात आली आहे. आतापर्यंत 'एमआयएम'चे सगळे डावपेच ठरल्याप्रमाणे यशस्वी होत असताना सज्जाद नोमाणींच्या भूमिकेने एमआयएम'चे इम्तियाज जलील आता डेंजर झोनमध्ये गेले आहेत.
भाजप महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्यासाठी परिस्थिती अधिक पोषक होत असल्याची ही चिन्ह आहेत. काँग्रेसने आधी दिलेला मराठा उमेदवार बदलणे, त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजू वैद्य यांनी माघार घेणे, सज्जाद नोमाणी यांनी 'एमआयएम'मधून बाहेर पडलेल्या समाजवादी पक्षाच्या गफ्फार कादरी यांना पाठिंबा जाहीर करणे या सगळ्या राजकीय घडामोडी इम्तियाज जलील यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरत आहेत. एमआयएम- वंचित-काँग्रेस आणि पंधरा मुस्लिम उमेदवार अशा सगळ्या गोंधळात अतुल सावे यांचा मार्ग मात्र मोकळा होताना दिसतो आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter