मुस्लिम पुरुषांना बहुविवाहाचा अधिकार - उच्च न्यायालय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा अधिकार
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: मुस्लिम पुरुषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा अधिकार

 

एकापेक्षा जास्त विवाहांना परवानगी देणाऱ्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यांनुसार मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा जास्त विवाहांची नोंदणी करण्याचा अधिकार असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्या. बी. पी. कुलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून विवाह नोंदणीवर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.

एका मुस्लिम व्यक्तीने अल्जेरियातील एका महिलेसोबत लग्न केले असून हा त्याचा तिसरा विवाह आहे. या विवाहाची नोंदणी करून घेण्यास ठाणे पालिकेने नकार दिल्याने मुस्लिम व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; त्या याचिकेवर न्या. बी. पी. कुलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्युरोज आणि मॅरेज ॲक्टच्या तरतुदींनुसार सदर नोंदणी बेकायदेशीर असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला होता. तर याचिकाकर्त्याने मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा जास्त विवाह करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा युक्तिवाद केला होता. या युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करत याचिकाकर्त्याला दिलासा दिला व त्याच्या नोंदणी अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने ठाणे पालिकेला दिले.

न्यायालय काय म्हणाले?
खंडपीठाने ठाणे पालिकेचा नोंदणी करून घेण्यास असलेला नकार हा गैरसमज असल्याचे स्पष्ट केले, कायद्याच्या संपूर्ण चौकटीत मुस्लिम पुरुषाला तिसरा विवाह नोंदवण्यापासून रोखेल, असे काहीही नाही. मुस्लिमांसाठी वैयक्तिक कायद्यांतर्गत, त्यांना एकावेळी चार पत्नी ठेवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्युरोज आणि मॅरेज ॲक्टच्या तरतुदींनुसार ठाणे पालिकेचा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही.