जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत झाले विक्रमी मतदान

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 12 h ago
मतदानासाठी आलेल्या काश्मिरी महिला
मतदानासाठी आलेल्या काश्मिरी महिला

 

जम्मू-काश्मीरमधील ९० जागांसाठी ३ टप्प्यात मतदान पार पडले. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा याठिकाणी विधनसभेच्या निवडणूक झाल्या आणि नागरिकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. 

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढले तर भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली. निवडणुकीपूर्वी याठिकाणी मतदारसंघाची फेररचना करण्यात आली होती. यामुळे ८३ जागांमध्ये ७ जागांची भर पडून जम्मू काश्मीर मध्ये एकूण ९० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण मतदार ८७.०९ लाख असून त्यातील ३.७ लाख नवमतदार आहेत. राजकीय पक्षांना जास्त जागा जिंकण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार होती.

तीन टप्प्यात पार पडल्या निवडणूका 
जम्मू काश्मीरमध्ये एकाच वेळी विधानसभेच्या निवडणूक न घेता निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात निवडणूका घेतल्या. यामध्ये  १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. 

नुकतेच मंगळवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. या टप्प्यात एकूण ४० जागांसाठी मतदान झाले. या ४० जागांसाठी ४१५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ३८७ पुरुष तर २८ महिला उमेदवार होत्या. या टप्प्यात एकूण ६९.६९ % मतदान नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये महिलांच्या मतदानाचा दर पुरुषांच्या मतदानापेक्षा जास्त होता. 

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला पार पडले. या टप्प्यात एकूण सात जिल्ह्यांमध्ये ६१.३८ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरूषांचे मतदान ६३.७५  टक्के तर महिलांचे मतदान ५८.९६  टक्के होते. शिवाय तृतीय लिंगाचे मतदान ४० टक्के होते.

पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २५ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली होती. या टप्प्यात एकूण २३९ उमेदवार रिंगणात होते आणि २५ लाख मतदार या उमेदवारांचे भविष्य ठरवणार होते. उशिरा पर्यंत चाललेल्या या  दुसऱ्या टप्प्यात ५७.३१ टक्के मतदान झाले.

पहिल्यांदाच मिळाला मतदानाचा अधिकार 
एका दशकानंतर जरी जम्मू काश्मीर मध्ये निवडणूक झाल्या असल्या तरी याठिकानच्या काही नागरिकांना यावर्षी मतदानाचा हक्क मिळाला. यामध्ये वाल्मिकी समाज आणि गोरखा समुदायाचा समावेश होता. या समुदायातील नागरिकांनी मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मतदान केल्यानंतर यातील काही मतदारांनी माध्यमांमध्ये आनंद व्यक्त केला.  

मतदानावेळी सुरक्षेची विशेष काळजी  
विधानसभा निवडणुकी आधी गेल्या काही दिवसांपासून या खोऱ्यात सातत्याने चकमकी होत होत्या. हे दहशतवादी हल्ले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचे बातम्या माध्यमांमध्ये आल्या. जम्मू काश्मीर प्रदेशाची परिस्थित लक्षात घेता निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी अधिकची सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे होते. या संदर्भात निवडणूक आयोगाने देखील सूचना केल्या होत्या. 

या सर्व गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाने सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांसह सुरक्षा दलाच्या ४०० हून अधिक तुकड्या तैनात केल्या होत्या. यामुळे जम्मू काश्मीर मधील तिन्ही टप्प्यातील मतदान अगदी सुरळीत पार पडले.  
  
८ ऑक्टोबरला महानिकाल 
तिन्ही टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. आता सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोल या निवडणुकी संदर्भात त्यांचे अंदाज वर्तवतील. केंद्रशासित प्रदेशातील ३९.१८ लाखांहून अधिक मतदारांनी ४१५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. मात्र जम्मू काश्मीर मध्ये कोण सत्ता स्थापन करणार हे येत्या ८ ऑक्टोबरला समजेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter