मालेगाव शहरात सात दिवस सुरु असलेल्या उर्दू पुस्तक मेळाव्यात शाळकरी, महिला, पुरुष व सर्व घटकातील नागरीकांनी मेळाव्याला हजेरी लावली. सात दिवसात लहान मोठ्या सुमारे २ लाख पुस्तकांच्या विक्रीतून ४० लाखाची कमाई झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात १ जानेवारीपासून उर्दू पुस्तक मेळावा सुरु झाला. शाळा, महाविद्यालय व अनेक ठिकाणी आयोजकांनी पुस्तक मेळाव्याची जनजागृती केली. पुस्तक मेळाव्यात १९ पुस्तक विक्रीचे स्टॉल लागले होते. स्टॉलमधून जनरल नॉलेज, खेळाची पुस्तके, खाना-खजाना, मेहंदी, चित्रकला यासह विविध पुस्तकांची विक्री झाली. पुस्तक मेळाव्यात महिला व लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. विशेषतः अनेक शाळांनी दुपारी पुस्तक मेळाव्यात शाळेतील विद्यार्थी सहभागी करून घेतले. शेवटचे तीन दिवस पुस्तक खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यापूर्वी शहरात राष्ट्रीय पुस्तक मेळावा झाला होता. यातून सुमारे अडीच कोटीच्या पुस्तकांची विक्री झाली होती.
अनेक तरुण मोबाईल वापरत असले तरी येथे पुस्तकांवरील प्रेम वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुस्तक व्यवसायाला चालना मिळणार असून शहरात असे पुस्तक मेळावे होणार आहेत. आगामी काळात राष्ट्रीय पातळीवरील पुस्तक मेळावे देखील पार पडतील. पुस्तक मेळाव्यात पुस्तक विक्री करणारे स्थानिक व्यावसायिक होते. उर्दू पुस्तकांपेक्षा कमी किमतीत व स्वस्तात असल्याने येथे नागरिकांचा कल होता. पालकांनी लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वाचनसंस्कृती विद्यार्थ्यांमध्ये वाढावी यासाठी पुस्तके खरेदी केली.
आयोजक रहेमानी सलीम अहमद यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले, "डिजिटल युग आले तरी मालेगाव शहरात पुस्तकांचे महत्त्व आजही टिकून आहे. भविष्यातही टिकून राहील. स्थानिक प्रकाशक व राष्ट्रीय प्रकाशक यांच्याशी चर्चा करून आगामी काळात राष्ट्रीय पातळीवरचे पुस्तक मेळावे घेऊ. सध्या येथे ऊर्दू पुस्तक मेळावा झाला. भविष्यात सर्व मराठी, इंग्रजी, हिंदी, ऊर्दू भाषांतील प्रकाशकांनाही निमंत्रित केले जाईल."
मोहम्मद अम्मार यावेळी बोलताना म्हणाले, "मेळाव्यात लहान मुलांचाही सहभाग होता. अनेक स्टॉल असल्याने पुस्तकांची विक्री झाली. पुस्तक मेळाव्यातून नागरिकांपर्यंत पोहोचता येते. यामुळे वाचनसंस्कृती वाढते."
- जलील शेख