'रमजान समाप्ती'निमित्त राष्ट्रपती भवनातील मस्जिदमध्ये विशेष आयोजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
रमजान समाप्तीनिमित्त राष्ट्रपती भवनानातील विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं
रमजान समाप्तीनिमित्त राष्ट्रपती भवनानातील विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं

 

नवी दिल्ली 

रमजानचा पवित्र महिना आता अंतिम चरणात आहे. त्यामुळे विविध मस्जिदिंमध्ये 'तरावीह' या रमजानच्या काळात होणाऱ्या विशेष नमाज समाप्तीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या तरावीहच्या नमाजमध्ये पूर्ण कुरआनचे वाचन टप्प्याटप्याने केले जाते. रमजानच्या शेवटच्या टप्प्यात कुरआन पूर्ण होते. त्याला ‘खतम शरीफ’ असेही म्हटले जाते.

नुकताच राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मस्जिदीतही ‘खतम शरीफ’चा कार्यक्रम पार पडला. भारताचे राष्ट्रपती रमजानच्या पवित्र महिन्यात तरावीह पूर्णत्वाच्या या समारंभात सहभागी होतात अशी परंपरा आहे. प्रत्येक काळात प्रत्येक राष्ट्रपतीने ती पाळलीये. यावेळीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही परंपरा कायम ठेवली. त्यांनी केवळ समारंभात भागच घेतला नाही तर मस्जिदच्या इमामांना भेटवस्तू देत त्यांचा सन्मानही केला.

 
 
राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मस्जिद
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा भारत बहुधर्मीय संस्कृतीचा खजिना आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती भवनातली मस्जिद. तिला राष्ट्रपती भवनाचा आध्यात्मिक चेहराही म्हणता येईल. रोजच्या नमाजाबरोबर रमजानच्या पवित्र महिन्यात तरावीह नमाजापासून ईदच्या नमाजापर्यंत सगळी व्यवस्था इथे होते. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक राष्ट्रपतीने इथे हजेरी लावलीये. नमाजींना शुभेच्छा दिल्यात. देशाच्या मुस्लिम राष्ट्रपतींपासून राष्ट्रपतीभवनातील चपराशापर्यंत सगळ्यांनी इथे एकत्र नमाज अदा केली आहे. 

कुणी सुरु केली ही परंपरा?
मस्जिदीमध्ये तरावीह संपवण्याच्या वेळी राष्ट्रपती आगमनाची परंपरा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून सुरू झाली. त्यांच्यानंतर झाकीर हुसेन, फखरुद्दीन अली अहमद आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ती जोपासली. आजही राष्ट्रपती मस्जिदमधील या आयोजनात सहभागी होतात. नमाजचे नेतृत्व करणाऱ्या इमाम साहेबांना पगडी आणि भेटवस्तू देतात. दुआत सहभागी होतात. 


माजी फुटबॉल प्रशिक्षक आनंदी बरुआ हे या परंपरेचे साक्षीदार आहेत. ते अनेक वर्षे राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी निवासात वास्तव्याला होते. ते सांगतात, “आम्ही राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी निवासात असताना दरवर्षी पाहायचो की राष्ट्रपती तरावीह संपवण्याच्या वेळी मस्जिदीत येतात. ज्ञानी जैल सिंग यांच्यापासून राम नाथ कोविंद यांच्यापर्यंत सगळ्या राष्ट्रपतींना मी या सोहळ्यात पाहिलंय. राष्ट्रपती भवनासाठी हा मोठा प्रसंग असतो. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय त्यात उत्साहाने सामील होतात.” 

राष्ट्रपती भवनाच्या कर्मचारी निवासात राहिलेल्या एकाने सांगितलं, “माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शुक्रवारच्या नमाजासाठी नियमित मस्जिदीत यायचे. नमाजानंतर तिथे बसून नमाजींशी बोलायचे. विशेषतः तरुणांशी जास्त गप्पा मारायचे. त्यांच्या शिक्षण आणि करिअरबद्दल विचारायचे.” 

राष्ट्रपती भवनात कधी बांधण्यात आली मस्जिद?
राष्ट्रपती भवनाला आधी व्हाइसरॉय हाऊस म्हटले जायचे. ते 1931 मध्ये बांधले गेले. ब्रिटिश वास्तुशास्त्रज्ञ एडविन लुटियन्स यांनी ही भव्य इमारत डिझाइन करताना धार्मिक स्थळासाठी जागा ठेवली नव्हती. त्यावेळी मस्जिदीसाठी जागा नव्हती. आसपास आधीच चर्च आणि गुरुद्वारा असल्यामुळे असे करण्यात आले असावे. 

1950 नंतर राष्ट्रपती भवनात राहणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी ही मस्जिद बांधली गेली. ही मस्जिद सर्वसामान्यांसाठी खुली नाही. पण ज्यांनी इथे उपासना केलीये, त्यांच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय आहे. 
 
मदर टेरेसा क्रेसेंट गेटमधून (गेट क्रमांक 31 मधून) आत गेल्यावर ही मस्जिद आहे. मेरठचे प्रसिद्ध इस्लामिक विद्वान या मस्जिदीचे पहिले इमाम होते हाफिज हुसेनुद्दीन. ते 2005 पर्यंत इथे इमाम होते.
 
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सगळ्या धर्मांचे सण साजरे करण्याची परंपरा पुढे नेली. राष्ट्रपती भवनात मंदिरही आहे. तिथे दिवाळी, होळी, जन्माष्टमी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. गुरुद्वारा आणि चर्च जवळच असल्याने शीख आणि ख्रिश्चनांसाठी वेगळी प्रार्थनास्थळं बांधायची गरज पडली नाही. 

ईदच्या दिवशी असते उत्साहाचे वातावरण
ईदच्या दिवशी राष्ट्रपती भवनात खास उत्साह असतो. राष्ट्रपती भवनातील सर्व मुस्लीम कर्मचारी एकत्रितपणे ईदची नमाज अदा करता. यावेळी राष्ट्रपती कार्यालयातून उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना ईदनिमित्त मिठाई वाटली जाते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter