अयोध्या, काशी आणि चित्रकूटमध्ये देण्यात आला 'हा' सतर्कतेचा इशारा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारने काशी, अयोध्या, चित्रकूटमध्ये गर्दी व्यवस्थापनाविषयी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या तिन्ही शहरांत अमावस्येनिमित्त पवित्र स्नान व दर्शनासाठी अलोट गर्दी जमली आहे. लोकांना सध्या या तीर्थक्षेत्रांना भेट देऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. अयोध्या काशी आणि इतर अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली आहे. 

अयोध्येच्या शरयू नदीवर आणि बनारसच्या घाटावर श्रद्धेने स्नान करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रयागराज पासून अयोध्या १६८ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे संगमांमध्ये शाही स्नान करून अनेक भाविक रामनगरी अयोध्येला पोहोचत आहेत. ज्या भाविकांना मौनी अमावस्येला प्रयागराजला जाता आले नाही, ते भाविक येथील शरयू नदीत स्थान करत आहे. काल पहाटे तीन वाजल्यापासून लाखो भाविकांचे येथे आगमन झाले होते.

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट काय म्हणाले?
अयोध्येतील राम मंदिर तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी आजूबाजूच्या भाविकांना पंधरा दिवसांनीच अयोध्या मध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना चंपत राय म्हणाले की, "महाकुंभ आणि मौनी अमावस्येमुळे प्रयागराज येथूनही मोठ्या संख्येने भाविक येत आहे. प्रयागराजहून रेल्वे आणि रस्त्याने भाविक अयोध्येत येत आहेत. गेल्या चार दिवसात आयोध्येला भेट देणाऱ्यांच्या संख्येत अभूतपूर्वक वाढ झाली आहे."

ते पुढे म्हणाले की, "आयोध्या धामची लोकसंख्या आणि आकार पाहता मोठ्या संख्येने भाविकांना एका दिवसात राम लल्लाचे दर्शन घेणे खूप अवघड आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भाविकांना जास्त पायी जावे लागत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या भाविकांनी १५ ते २० दिवसांनी अयोध्येत दर्शनासाठी यावे अशी विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या येणाऱ्या भाविकांना रामलल्लाचे सहज दर्शन घेता येईल. यामुळे सर्वांची योग्य सोय होईल. वसंत पंचमी नंतर फेब्रुवारी महिन्यात मोठा दिलासा मिळेल." अशी विनंती त्यांनी केली आहे.