भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यात गुरुवारी एक महत्त्वपूर्ण दूरध्वनी संवाद झाला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्याचील- जमीन, हवाई, सागरी आणि अवकाश यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत असलेल्या संरक्षण भागीदारीचा आढावा घेतला. प्रगत तंत्रज्ञान, संरक्षण औद्योगिक पुरवठा साखळी, इंटरऑपरेबिलिटी, लॉजिस्टिक्स, माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त लष्करी सराव यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात, द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
पीट हेगसेथ यांनी यूएस संरक्षण सचिव म्हणून पदभार स्विकारल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युनायटेड स्टेट्स दौऱ्याच्या आधी राजनाथ सिंह यांच्याशी हा संवाद साधला. या संवादामुळे दोन्ही देशांतील संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी एक नवीन संबंध जोडले गेले आहेत.
दोन्ही मंत्र्यांनी जमीन, हवाई, सागरी आणि अवकाश अशा विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या भारत-अमेरिका संरक्षण सहकार्याच्या विस्तृत आढावा घेतला. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटल्याप्रमाणे, “दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण भागीदारीच्या चालू आणि उल्लेखनीय विस्ताराचे कौतुक केले आणि हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.”
दोन्ही नेत्यांमधील संवादाचा मुख्य भाग म्हणजे, दोन्ही देशातील सरकारे स्टार्ट-अप्स, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याद्वारे, संरक्षणाच्या नवकल्पनासाठी समर्थन वाढविण्याचा करार करण्याबाबत दिलेली सहमती. याशिवाय २०२५-२०३५ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी त्यांच्यातील भागीदारीची रचना करण्याच्या उद्देशाने, सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यावर, दोन्ही बाजूंनी जोर देण्यात आला.
या संवादाचे वर्णन करत केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही दोन्ही देशांतील चालू संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय सुरक्षा संबंधांचा विस्तार आणि सखोलतेसाठी उपलब्ध मार्गांचे अन्वेषण केले. आम्ही एक महत्त्वाकांक्षी अजेंडा देखील मान्य केला, ज्यात कार्यात्मक प्रणाली, गुप्तचर, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा-औद्योगिक सहकार्याचा समावेश आहे. मी हेगसेथ यांच्याोबत जवळून काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
भारत आणि अमेरिकेने २०२३ मध्ये स्विकारलेल्या, संरक्षण औद्योगिक सहकार्याच्या रोडमॅप अंतर्गत, दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. जेट इंजिन, युद्धसामग्री, ग्राउंड मोबिलिटी सिस्टम, एअर कॉम्बॅट आणि समुद्राखालील क्षमतांसह, प्रमुख संरक्षण क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान सहकार्य आणि सह-उत्पादनाला गती देण्यावर, हा रोडमॅप आधारलेला आहे.
दोन्ही देश या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, प्राधान्यक्रमाने सह-उत्पादन उपक्रमांना पुढे नेत आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या धोरणात्मक अभिसरणाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. एक सुरक्षित आणि लवचिक सुरक्षा संबंधासाठी, सामायिक दृष्टिकोन असलेली भारत-अमेरिकेची ही भागीदारी, येणाऱ्या काळात आणखी मोठे टप्पे गाठण्यासाठी सज्ज आहे.