लोकलचा प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि आरामदायी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय रेल्वे देशभरातील शहरांमध्ये धावणाऱ्या लोकल आणि मेट्रो प्रवासाला आणखी सुरक्षित करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ‘कवच’च्या अत्याधुनिक आवृत्तीचे ‘कवच ५.०’ लवकरच मुंबईसारख्या शहरांमधील रेल्वेच्या सुरक्षित संचलनासाठी सादर केले जाईल." रेल्वे मंत्रालयाने याबाबत म्हटले आहे की, कवचच्या या नव्या आवृत्तीमुळे रेल्वेगाड्यांमधील अंतर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या अधिक सुरक्षित आणि कार्यक्षमतेने धावू शकतील. कवच ५.० डिसेंबरपर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की, "भारतीय रेल्वेने पुढील काळात महाराष्ट्रात १,७३,८०४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. ही योजना महाराष्ट्राचे राष्ट्रीय रेल्वेचे महत्त्व आणि त्याच्या भविष्यातील विकासाला अधोरेखित करते. कवच ५.० हे अत्याधुनिक आणि सुरक्षित यंत्रणा आहे. ही यंत्रणा लोकल रेल्वेचा वेग वाढवेल आणि त्यांना अधिक सुरक्षित करेल."

रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, "सध्या मुंबई आणि इतर महानगरांमधील लोकल रेल्वे सेवांमध्ये दोन गाड्यांमधील अंतर सुमारे १८० सेकंदांचे आहे. कवच ५.० च्या मदतीने या वेळेत ३० टक्के कपात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे दोन गाड्यांमधील अंतर फक्त १२० सेकंदांवर येईल. या वाचलेल्या वेळेत आम्ही ३० ते ५० टक्के अधिक गाड्या चालवू शकतो. यामुळे लोकल रेल्वेतील एकूण प्रवासी संख्येत दीडपट वाढ होईल."

याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने केलेल्या सुधारणांवरही भाष्य केले. लवकरच २३८ नव्या एसी रॅक आणल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रॅक मुंबईतील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन खास पद्धतीने डिझाइन करण्यात आल्या आहेत. त्या अधिक आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देतील. यामध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि रोलिंग स्टॉकमधील प्रगतीमुळे उपनगरीय सेवांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुधारेल.