कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी (दि.१७) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावर अल-थानी यांचे स्वागत केले. भारत आणि कतारमधील राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, आज सकाळी कतारच्या अल-थानी यांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. यानंतर ते 'हैदराबाद हाऊस' येथे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली जाईल.
यापूर्वी अल-थानी यांचा भारत दौरा
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी ते २०१५ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झाले आहेत. यावेळीही कतारचे अमीर अल थानी यांच्या दौऱ्यावर महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी अल-थानी यांना भारत दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "माझे बंधू कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलो. त्यांना सुखदायी भारत दौऱ्यासाठी शुभेच्छा आणि उद्याच्या आमच्या भेटीची उत्सुक आहोत."