महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशीही राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने आज पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून, जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

पावसाने रात्रीपासून जोर धरला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. शहरातही धोधो सुरु आहे. यामुळे पुणे शहरासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी हे आदेश दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

तसेच राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक भागांत संततधार पाऊस सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

रायगड, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्य़ांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्याच्या घाटांवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

उत्तर कोकण आणि लगतच्या घाट परिसरात गेल्या १० ते १५ दिवसांमध्ये झालेला पाऊस आणि सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर पाहता परिसरात दरडी कोसळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे दरडप्रवण क्षेत्रांतील नागरिकांनी पुढील ४८ तास सावध राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे आणि पालघरमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने ठाणे, रायगड, पालघरसाठी गुरुवार साठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत गुरुवारी मध्यम ते जोरदार पाऊस असेल. २५ जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पाऊस) जारी करण्यात आला आहे.