मालेगावच्या जनतेसाठी पुरेसा निधी द्या - आमदार मुफ्ती इस्माईल

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 7 h ago
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

 

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. नुकतेच १० मार्चला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे. या समाजासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

यानंतर अर्थसंकल्पावर विधीमंडळात अनुमोदन करताना विविध आमदारांनी भाष्य केले. यामध्ये सर्वात चर्चेत राहिले ते मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल. मुफ्ती इस्माईल हे एआयएमआयएम पक्षाचे नेते आहेत. 
  
मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी अर्थसंकल्पाचे अनुमोदन करताना अजित पवार यांचे आभार मानले. तसेच त्यांनी मालेगावमध्य क्षेत्राच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी केली. ते म्हणाले, “मी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. या अर्थसंकल्पात त्यांनी बेघर लोकांना घर, बेरोजगारांना रोजगार, मुलांसाठी शिक्षण, लाडक्या बहीणींसाठी पैसे देण्यात आले आहेत.”

पुढे ते म्हणतात, “माझ्या मतदारसंघात ६० टक्के झोपडपट्टीत राहतात. ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मी अजित पवार यांना विनंती करतो की त्यांनी मालेगावसाठी चांगले बजेट द्यावे. जेणेकरून मालेगावच्या जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल.” 

पॉवरलुमच्या वीज बिलात सूट हवी 
कापड उद्योगाचे शहर म्हणून मालेगाव मध्यची ओळख आहे. देशभरात एकूण ४० लाखापेक्षा जास्त पॉवरलुम सुरू चालतात. यामध्ये सादा पॉवरलुम ३६ लाख आहेत. त्यातील १८ लाख पॉवरलुम महाराष्ट्रात चालतात.  याविषयी मुफ्ती मोहम्मद इस्माईल म्हणाले, “शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय हा पॉवरलुम आहे. पॉवरलुमसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा (एक युनिट) दर जास्त आहे. तो वीजदर कमी असला पाहिजे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात वीज बिलात सूट देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”  

 मालेगावमध्ये टेक्स्टाइल पार्क व्हावे - मुफ्ती इस्माईल 
मालेगाव हा मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहे. मालेगाव कापड उद्योगाचे शहर असले तरीही याठिकाणी एकही टेक्स्टाइल पार्क नाही. अर्थसंकल्पावर बोलताना मुफ्ती इस्माईल यांनी सरकारकडे  मालेगावमध्ये टेक्स्टाइल पार्क व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील १८ लाख पॉवरलुमपैकी ४ लाख पॉवरलुम माझ्या मतदारसंघात आहेत. एका पॉवरलुममागे २-३ लोकांना रोजगार मिळतो. मालेगावमध्ये टेक्स्टाइल पार्क झाले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.”

पुढे ते म्हणाले, “मालेगावमध्ये पॉवरलुम असूनदेखील याठिकाणी जिनिंग फैक्ट्री आणि स्पिनिंग मिल नाही. आपल्या राज्यात कापूस पिकत असला तरी तो यार्न ( कापसाच्या धाग्यांपासून बनवलेला धागा) करण्यासाठी तामिळनाडू सारख्या राज्यात जातो. तिथून पुन्हा तो धागा आल्यानंतर महाराष्ट्रात कापड तयार केले जाते. त्या कापडावर फिनिशिंग करण्यासाठी ते पुन्हा गुजरातमध्ये पाठवले जाते. यामुळे वेळेसोबत मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. हा पैसा वाचवण्यासाठी सरकारने याठिकाणी जिनिंग फैक्ट्री आणि स्पिनिंग मिल तयार करणे आवश्यक आहे. असे झाले तर याचा मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रातील जनतेला होईल.” 

मालेगावमधील मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्याठिकाणी इंजिनिअरिंग आणि मायनॉरिटी मेडिकल कॉलेज असायला पाहिजे अशा मागण्यांसह मुफ्ती इस्माईल यांनी सरकारचे लक्ष वेधले.  याठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. मुफ्ती इस्माईल यांच्या मागण्यांवर सरकारने लक्ष दिले तर या शहराचा विकास होऊ शकतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter