देशाच्या एकतेवर भर देत फुटीमुळे नेहमीच पराभवाचा सामना करावा लागतो, त्यामुळे सीमा संरक्षित ठेवण्याइतकेच देशाच्या संस्कृतीचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. एका दूरचित्रवाणी वाहिनीने कार्तिक महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या ‘कोटी दीपोत्सवम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘आपली एकता जेव्हा कमजोर होते, तेव्हा आक्रमक आपली संस्कृती, सभ्यता नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे, इतिहासापासून धडा घेत एकतेची प्रतिज्ञा घ्यायला हवी. फूट पाडणारे धर्म, जाती, वंशासह विविध मुद्द्यांवरून फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तुम्ही फूट पडू दिली नाही पाहिजे.
तसेच इतरांमध्येही फूट पाडता कामा नये. संपूर्ण देशाने एकत्रित राहायलाच हवे. आपण एक राहायलाच हवे. आपण फूट टाळली तर विकासाच्या मार्गावर चालत सशक्त व विकसित भारताची निर्मिती करू शकतो.’ प्राचीन धर्मग्रंथांचा हवाला देत एकता ही देशाची ताकद आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजनाथसिंह म्हणाले, "कोणताही देश केवळ जमीन व लोकांपासून तयार होत नाही तर तो खऱ्या अर्थाने संस्कृतीपासून निर्माण होतो. भारत संपूर्ण जगाकडेच एक कुटुंब म्हणून पाहतो, त्यामुळे एकतेचा प्रकाश केवळ आपल्या देशातच नव्हे तर सबंध जगात पसरायला हवा. मोदी सरकारने सांस्कृतिक पुनरुत्थानावर लक्ष केंद्रित केले आहे. देशासाठी राजकीय, आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच सांस्कृतिक विकासही महत्त्वाचा आहे. जर एखाद्या राष्ट्राने आपली संस्कृती गमावली तर त्या देशाचे नुकसान होते."
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणतात, देशाच्या सीमांचे रक्षण करणे ही संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मात्र, देशाच्या संस्कृतीचे रक्षण हे सीमांच्या रक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे. भारत केवळ राजकीयदृष्ट्या अस्तित्वात नाही तर देशाला हजारो वर्षांची सांस्कृतिक ओळख असून ती जगभरात स्वीकारली गेली आहे.
अजमेरमधील हॉटेलचे ‘अजयमेरू’ नामकरण
जयपूर - शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने राजस्थान सरकारने अजमेरमधील राज्य पर्यटन महामंडळाचे सुप्रसिद्ध हॉटेल खादीमचे ‘अजयमेरू’ असे नामकरण केले आहे. राजस्थान पर्यटन महामंडळाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि उत्तर अजमेरचे आमदार वासुदेव देवनानी यांच्या निर्देशानंतर हे आदेश जारी केले. ऐतिहासिकदृष्ट्या, अजमेर हे अजयमेरू म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक, प्राचीन ग्रंथांत तसा उल्लेख आहे.