आंबेडकरांच्या अवमान प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुढे सरसावले. "काँग्रेस आणि त्यांच्या कुजलेल्या इकोसिस्टीमला वाटत असेल की असत्य कथनातून अनेक वर्षांच्या दुष्कृत्यांवर विशेषतः बाबासाहेबांच्या अपमानावर पांघरूण घालता येईल, तर ते मोठी चूक करत आहेत," असा घणाघाती हल्ला पंतप्रधानांनी चढविला.
डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी काँग्रेसने अनेक चुकीची पावले उचलली असल्याचा दावाही पंतप्रधानांनी केला. डॉ. आंबेडकर यांच्या अपमानावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया 'एक्स'वरून एकापाठोपाठ एक ट्विट करत काँग्रेसवर शरसंधान केले. गृहमंत्री शहा यांचीही त्यांनी जोरदार पाठराखण केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की डॉ. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आणि अनुसूचित जाती जमातींकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसच्या काळ्या इतिहासाची गृहमंत्री शहा यांनी संसदेत पोलखोल केली. शहा यांनी मांडलेल्या सुस्पष्ट तथ्यांमुळे कॉंग्रेसचे नेते भांबावले आहेत म्हणूनच त्यांनी आता नाटक सुरू केले आहे. मात्र जनतेला सत्य माहिती आहे ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे.
"असत्य कथनातून आपली अनेक वर्षांची दुष्कृत्ये विशेषतः डॉ. बाबासाहेबांचा अपमान लपविता येईल असे काँग्रेसला आणि त्यांच्या कुजक्या इकोसिस्टिमला वाटत असेल तरी ते गंभीर चूक करत आहेत. डॉ. आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्यासाठी आणि अनुसूचित जाती, जमातींना अपमानित करण्यासाठी एका कुटुंबाच्या नेतृत्वाखालील एका पक्षाने कशा प्रकारे घाणेरडे प्रकार केले हे देशातील जनतेने अनेकदा पाहिले आहे," असा प्रहारही पंतप्रधानांनी केला.
काँग्रेसवर तोफ डागताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या शासनकाळात अनुसूचित जाती, जमातींविरुद्ध सर्वांत मोठे हत्याकांड झाले हे सत्य ते लपवू शकत नाहीत. काँग्रेसने अनुसूचित जाती, जमातींसाठी काहीही भरीव काम केलेले नाही. वर्षानुवर्षे सत्तेत राहुनही या समुदायांच्या सक्षमीकरणासाठी काँग्रेसने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभव केला. पंडित नेहरूंनीही त्यांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यांच्या पराभवाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला. काँग्रेसने डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर संसदेच्या केंद्रीय कक्षामध्ये (सेंटल हॉल) बाबासाहेबांच्या तैलचित्राला मानाचे स्थान देण्यात आले नाही यावरून काँग्रेसची विचारसरणी स्पष्ट होते."
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
■ केंद्र सरकारने पंचतीर्थांचा विकास केला
■ चैत्यभूमीच्या जागेचा वाद निकाली काढला
■ लंडनमधील डॉ. आंबेडकरांचे घर ताब्यात घेतले
■ डॉ. आंबेडकरांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य