अब्दुल्ला सरकारच्या शपथविधीसाठी मार्ग मोकळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल सहा वर्षांनंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आहे. त्याची अधिसूचना रात्री उशिरा जारी करण्यात आली. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केंद्राकडे पाठवली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १९ ऑक्टोबरपर्यंत तीन देशांच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अधिसूचनेला मंजुरी दिली.

आता उपराज्यपाल लवकरच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीच्या निवडणुकीतील विजयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून त्यामुळे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात राजपत्र अधिसूचना जारी केली आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने बाजी मारली असून आता ते सरकार स्थापन करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची आघाडीचा नेता म्हणून निवड करण्यात आली असून ते जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील.

१६ ऑक्टोबरला होऊ शकतो शपथविधी
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा १६ ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये होऊ शकतो. मात्र, शपथविधीची अंतिम तारीख अद्याप अधिकृत झालेली नाही.

गुरुवारी झालेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या बैठकीत पक्षाने एकमताने ओमर अब्दुल्ला यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये ओमर अब्दुल्ला यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

नॅशनल कॉन्फरन्सने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकल्या, तर त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने सहा आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) ने एक जागा जिंकली. अशाप्रकारे ९५ सदस्यीय विधानसभेत आघाडीला बहुमत मिळाले आहे. दुसरीकडे भाजपने ४२, पीडीपीने ३ आणि ७ अपक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.