मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू येणार भारत दौऱ्यावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 14 h ago
पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू
पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू

 

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू ७ ऑक्टोबर २०२४ रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा 9 ऑक्टोबरपर्यंत चालेल. मुईझू यांचा भारत दौरा त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा पहिला स्वतंत्र द्विपक्षीय दौरा आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत-मालदीव यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मालदीवने चीनकडे कल झुकवणारी परराष्ट्र धोरणे अवलंबली होती, परंतु आता भारताशी संबंध सुधारणे हाच त्यांच्या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. मुईझू यांच्या सरकारने भारतासोबत बिघडलेल्या संबंधांनंतर मैत्रीपूर्ण धोरण स्वीकारले आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध काहीकाळ  तणावपूर्ण झाले होते. 

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिला दौरा भारताऐवजी तुर्की आणि नंतर चीनला केला होता. यापूर्वी, जवळजवळ प्रत्येक मालदीव राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भेटीसाठी भारताला प्राधान्य देत असत.  

सत्ता स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांनी भारत-मालदीव संबंधांच्या दृष्टीने अनेक पावले उचलली. त्यांनी संपूर्ण राष्ट्रपतीपदाच्या प्रचारामध्ये 'इंडिया आऊट' हा मुद्दा पुढे केला होता. त्यांच्या पक्षाचा मुख्य प्रचार मुद्दा देशातून भारतीय सैन्य हटवण्याचा होता.

या पार्श्वभूमीवर मुईझू भारतात येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुईझू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर भारतीय नेत्यांशी चर्चा करतील. या दौऱ्यात भारताने मालदीवला दिलेल्या आर्थिक मदतीसंबंधी मुद्देही चर्चेत असण्याची शक्यता आहे. मालदीवला इस्लामिक बाँडचे पेमेंट चुकवण्यापासून रोखण्यासाठी भारताने आर्थिक साहाय्य केले होते. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना अधिक बळकटी मिळाली.