'यामुळे' महाकुंभ मेळ्यात झाली चेंगराचेंगरी

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची घटना
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीची घटना

 

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील दुसरे अमृत स्नान महोत्सव मौनी अमावस्येपूर्वी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री दोन वाजता ही दुर्घटना घडली असून यामध्ये १० भाविकांचा मृत्यू झाला आहे.  ४० पेक्षा जास्त भाविक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी भाविकांवर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नरेंद्र मोदी यांनी फोन करून लवकरात लवकर मदत करण्यास सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?
आज मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे शाही स्नान पार पडणार होते . त्यामुळे भाविकांनी मध्यरात्री त्रिवेणी संगमावर मोठी गर्दी केली होती. काही भाविकांनी बॅरिकेट तोडल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. यात ४० पेक्षा अधिक जण जखमी झाले, तर जवळपास १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही मिनिटांतच पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली.

पंतप्रधान मोदींनी या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. केंद्र सरकार या घटनेकडे लक्ष ठेऊन असल्याचं त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ आपल्या सोशल मिडियावरून लोकांना आवाहन केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, "मी तमाम संत, भक्त, राज्यातील आणि देशातील जनतेला आवाहन करतो की, अफवांवर लक्ष देऊ नका..  संयमाने वागा, प्रशासन तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत आहे..."