महाकुंभाला जाणाऱ्या मार्गांवर शेकडो किलोमीटर्स वाहनांच्या रांगा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रयागराज महाकुंभ परिसरात वाहतूक कोंडी
प्रयागराज महाकुंभ परिसरात वाहतूक कोंडी

 

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे तासनतास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परिणामी, प्रशासनाने महाकुंभ परिसरात वाहतुकीवर आणखी निर्बंध घातले आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी पाहता प्रशासनाने संगम रेल्वे स्टेशन १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

समाजमाध्यमांवर सामायिक झालेल्या एका ध्वनिचित्रफितीत संगम मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची न संपणारी रांग दिसत होती. ही वाहतूक रांग तब्बल २०० ते ३०० किमी लांब होती असा दावा अनेकांनी केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा म्हणून चर्चिल्या जाणाऱ्या महाकुंभाच्या व्यवस्थापनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

गेल्या काही दिवसांत प्रयागराजला इतर शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्थानकावरही तुडुंब गर्दी आहे. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर आजूबाजूच्या राज्यांनाही या वाहतूक कोंडीची झळ सहन करावी लागत आहे. माघी पौर्णिनेला माघ महिना संपत असल्याने त्यापूर्वी पवित्र स्नान करण्यासाठी लोकं प्रयागराजच्या दिशेने निघाली आहेत. 

पोलिसांचे भाविकांना परतण्याचे आवाहन
वाराणसी, लखनऊ, कानपूर, रायबरेली, जौनपूर आणि कौशांबी येथून प्रयागराजला येणारे सर्व महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाने भाविकांना १५ फेब्रुवारी नंतर येण्याचे आवाहन केले आहे. गर्दीमुळे पेट्रोल आणि गॅस स्टेशनवर लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांनाही अडचणी येत आहेत. 

वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी भाविकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.