लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रविवारी सांगता झाली. या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती, रायगड, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी—सिंधुदूर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा यात समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्वच्या सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय कर्नाटकमधील 14, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8 आणि छत्तीसगडमधील 7 मतदारसंघांत मतदान होणार आहे. या टप्प्यात 10 जागांवर हाय प्रोफाईल लढती होत आहेत. मध्य प्रदेशातील गुणा येथे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुकाबला कॉंग्रेसच्या राव यादवेंद्र सिंह यांच्याशी होत आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी शिंदे कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांचा भाजपचे उमेदवारी के. पी. यादव यांनी पराभव केला होता.
उत्तर प्रदेशातील आग्रा मतदारसंघात केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल हे मैदानात आहेत. त्यांची लढत बसपाच्या पूजा अमरोही आणि सपाच्या सुरेशचंद्र कदम यांच्याशी होत आहे. दलित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असूनही अद्यापपर्यंत या मतदारसंघात बसपाला खाते उघडता आलेले नाही.
ज्या अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशिनमध्ये बंद होणार आहे, त्यात सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव (मैनपुरी), भाजप नेते प्रल्हाद जोशी (धारवाड), कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (बहरामपूर) आणि भाजप नेत्या पल्लवी डेम्पो (दक्षिण गोवा) यांचा समावेश आहे.