वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवास शनिवार (ता. ७) पासून प्रारंभ होत असून, १७ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. या कालावधीत हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडण्यासाठी शहर पोलिस दल सज्ज असून, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत दिली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त आयुक्त रविंद चावरिया, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल या वेळी उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरात तीन हजार ७९८ सार्वजनिक मंडळांकडून आणि सहा लाख ६४ हजार २५७ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळे, शांतता समिती, पोलिस मित्र, ढोलताशा पथकांच्या पदाधिकाऱ्यांच्या २०२ बैठका घेण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) पथके नेमण्यात आली आहेत. उत्सवादरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारीक नजर राहणार आहे. एक हजार ७४२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महिलांची छेडछाड करणाऱ्यांची धिंड -
सोनसाखळी, मोबाईल चोरी, पाकिटमारी आणि महिलांची छेडछाड रोखण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. उत्सवात परराज्यांतील चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. त्यामुळे सर्व लॉजेस आणि हॉटेलचालकांना खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या असून, पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांची शहरात धिंड काढण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
पोलिस बंदोबस्त नियोजन -
अतिरिक्त पोलिस आयुक्त : ४
पोलिस उपायुक्त : १०
सहाय्यक पोलिस आयुक्त : २३
पोलिस निरीक्षक : १२८
सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक : ५६८
पोलिस कर्मचारी : ४६०४
होमगार्ड : ११००
राज्य राखीव पोलिस दल : एक तुकडी
शीघ्र कृती दल (क्यूआरटी) : १० पथके
गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश -
- १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ध्वनीवर्धकास सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी.
- साऊंड सिस्टीम लावताना आवाजाच्या डेसिबलबाबत नियमांचे पालन अनिवार्य.
- साउंड सिस्टीमबाबत ७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
- गणेश मंडपात किंवा मिरवणुकीत ज्वालाग्राही पदार्थास बंदी
- सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी
‘माय सेफ पुणे’ अॅपचा वापर
भाविकांच्या सुरक्षितता आणि पोलिस बंदोबस्ताच्या नियोजनासाठी ‘माय सेफ पुणे’ अॅपचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनादिवशी बंदोबस्त आणि मंडळांची माहिती या ॲपद्वारे प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्रे, पादचारी मार्ग, विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्य स्थितीची माहिती दिली जाणार आहे.
दहा दिवस मद्यविक्री बंदीचा प्रस्ताव -
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने १७ आणि १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील. तसेच, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने ७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दिला आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.