पंतप्रधान मोदींच्या थायलंड दौऱ्यात झाले 'हे' धोरणात्मक निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 17 h ago
पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा
पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थायलंड दौरा सुरू आहे. दरम्यान बँकॉकमध्ये त्यांनी थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांची भेट घेतली. सरकारी निवासस्थानी पोहोचताच थायलंडच्या पंतप्रधानांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही दोन्ही नेत्यांची दुसरी भेट होती. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये व्हिएन्टियान येथे झालेल्या आसियान शिखर परिषदेच्या वेळी दोघे एकमेकांना भेटले होते. या भेटीत भारत आणि थायलंड यांच्यातील संबंधांना नवीन दिशा देण्याचा संकल्प दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

या भेटीत पंतप्रधान मोदी आणि शिनावात्रा यांनी भारत-थायलंडमधील द्विपक्षीय सहकार्याचा संपूर्ण आढावा घेतला. त्यांनी राजकीय संबंध, संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक यासह व्यक्ती-व्यक्तीमधील संपर्क अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संचारसंपर्क, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, डिजिटल क्षेत्र, शिक्षण, संस्कृती आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर घोटाळे यासारख्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र काम करण्यावरही भर देण्यात आला. 

धोरणात्मक भागीदारी
या भेटीदरम्यान भारत आणि थायलंड यांच्यात धोरणात्मक भागीदारी स्थापन करण्याच्या संयुक्त घोषणापत्राचे आदानप्रदान झाले. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक करार झाला. याशिवाय हातमाग आणि हस्तकला, डिजिटल तंत्रज्ञान, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि सागरी वारसा या क्षेत्रांतील सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या. 

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि थायलंडच्या डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाज मंत्रालयात डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यासाठी करार झाला. तसेच गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यासाठी भारताच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि थायलंडच्या संस्कृती मंत्रालयात करार झाला. याशिवाय सूक्ष्म उद्योग आणि हस्तकला क्षेत्रातही दोन्ही देशांनी सहकार्याचे करार केले.

कॉन्सुलर संवादाचे स्वागत
दोन्ही नेत्यांनी भारत-थायलंड कॉन्सुलर संवाद स्थापनेचे स्वागत केले. या संवादामुळे दोन्ही देशांतील लोकांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या भेटीत झालेल्या चर्चेची संपूर्ण फलनिष्पत्ती पाहण्यासाठी संबंधित यादी उपलब्ध आहे.

सांस्कृतिक संबंधांना बळ
या भेटीचे औचित्य साधून थायलंड सरकारने सद्भावनेचे प्रतीक म्हणून १८व्या शतकातील रामायण भित्तिचित्रांचे चित्रण असलेले विशेष टपाल तिकीट जारी केले. दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना थायलंडच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना पाली भाषेतील बौद्ध पवित्र ग्रंथ ‘तिपिटक’ची विशेष आवृत्ती भेट दिली. 

तसेच पंतप्रधान मोदींनी गुजरातमधून उत्खनन केलेले भगवान बुद्धांचे अवशेष थायलंडला पाठवण्याची तयारी दर्शवली, जेणेकरून तिथले लोक त्यांना आदरांजली वाहू शकतील. गेल्या वर्षीही भगवान बुद्ध आणि त्यांच्या दोन शिष्यांचे पवित्र अवशेष भारतातून थायलंडला नेण्यात आले होते. त्यावेळी ४० लाखांहून अधिक लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

बँकॉकमध्ये भारतीय समुदायाने केले स्वागत
नरेंद्र मोदी यांचे थायलंडमध्ये जंगी स्वागत झाले. याच स्वागताचा एक भाग म्हणून नरेंद्र मोदी यांचे स्वागत थायलंडचे ‘रामकियेन’ या महाकाव्यच्या सादरीकरणाने करण्यात आले. पंतप्रधान मोदींसाठी रामायणचे थाई रुपांतर असलेला ‘रामकियेन’ या महाकाव्याचा नृत्याविष्कार सादर करण्यात आला. रामकियेन हे थायलंडच्या संस्कृतीचा प्रभाव असलेले रामायण आहे. या रामकियेनकडे थायलंडमध्ये राष्ट्रीय महाकाव्य म्हणून पाहिले जाते.

पंतप्रधान मोदींचे बँकॉकमध्ये आगमन होताच त्यांना सैनिकी मानवंदना देण्यात आली. याशिवाय बँकॉकमधील भारतीय समुदायाने प्रार्थना आणि उत्साहाने त्यांचे स्वागत केले. “बँकॉकमधील भारतीय समुदायाने माझे खूप प्रेमाने स्वागत केले. भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध खूप मजबूत आहेत आणि ते लोकांमधूनच दिसून येतात,” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आपल्या प्रस्थानापूर्वीच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “या भेटीत मला थायलंडच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची संधी मिळेल. आमची ऐतिहासिक मैत्री, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विचारांवर आधारित आहे. या भेटीतून हे संबंध अधिक मजबूत होतील.”