वक्फ कायद्यामुळे गरीब मुस्लिमांना मिळतील त्यांचे हक्क - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

वक्फ (सुधारणा) विधेयक काही दिवसांपूर्वी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला मंजूरी दिली. त्यामुळे वक्फ विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. या निर्णयाचे देशभरात अनेक ठिकाणी या विधेयकांचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विधेयकाविरुद्ध आंदोलने केली जात आहे. 

दरम्यान वक्फ विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळलेला असताना, देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रुपांतर झाल्यावर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.१४) हरियाणाच्या हिसार ते अयोध्या विमानसेवेचे उद्घाटन केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावरचसभा घेतली. यावेळी त्यांनी वक्फ (सुधारणा) विधेयकावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी वक्फ विधेयकावरून काँग्रेसवर हल्लाबोल करताना काही सवलाही विचारले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, "काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फच्या नियमांमध्ये बदल केले, काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवले आहे. काँग्रेसने फक्त मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केलं. नवीन कायद्याला त्यांचा विरोध हेच सिद्ध करतो. काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही? तसेच काँग्रेस निवडणुकीत ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी का राखीव ठेवत नाही?”

वक्फबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. जर वक्फच्या मालमत्तांचा लाभ गरजूंना मिळाला असता, तर त्यांचे कल्याण झाले असते. पण यातून फक्त जमीन माफियांचाच फायदा झाला. वक्फ कायद्यातील दुरुस्तीमुळे जमिनीची लूट थांबेल, गरीबांची लूट थांबेल. आदिवासींची जमीन किंवा मालमत्ता वक्फ बोर्डाला हात लावता येणार नाही. गरीब मुस्लिम आणि पसमांदा मुस्लिमांना त्यांचे हक्क मिळतील. हाच खरा सामाजिक न्याय आहे."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष त्यांच्या सरकारला प्रेरणा देते. प्रत्येक निर्णय आणि धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. पण विरोधी पक्षात असलेल्या कॉँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवले आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. पण दुर्दैवाने काँग्रेस यालाही विरोध करत आहे."

काँग्रेसवर आरोप करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आरक्षणाचे फायदे एससी/एसटी आणि ओबीसी समुदायांपर्यंत पोहोचले आहेत की नाही हे तपासण्याची काँग्रेसने कधीही तसदी घेतली नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या आधारावर आरक्षणाला स्थान नसावं. पण काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्येही बदल केले.”

ते पुढे म्हणतात, "बाबासाहेब आंबेडकरांना समानता हवी होती, पण काँग्रेसने देशात व्होट बँकेच्या राजकारणाचा विषाणू पसरवला. प्रत्येक गरीब व्यक्तीला सन्मानाने जगावे, स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करावीत, असे बाबासाहेबांना वाटायचे. पण काँग्रेसने एससी/एसटी आणि ओबीसी समुदायांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवले.”