कुंभमेळा म्हणजे एकतेचा महायज्ञ - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 11 h ago
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभसारख्या घटना सकारात्मक संदेश देतात.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभसारख्या घटना सकारात्मक संदेश देतात.

 

‘कुंभमेळा हा एकतेचा महायज्ञ आहे, जिथे जातीचे भेद नाहीसे होतात. नद्यांच्या संगमामध्ये डुबकी घेणारा प्रत्येक भारतीय हा ‘एक भारत, महान भारत’चे असामान्य दृश्य साकारतो. कुंभमेळ्यात सामान्यांसह साधूसंत, विद्वान असे सगळेच एकत्र येतात आणि तीन नद्यांच्या संगमात डुबकी घेतात,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

नवीन वर्षात होणारा कुंभमेळा देशाची सांस्कृतिक, आध्यात्मिक ओळख एका नवीन उंचीवर नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी कुंभमेळ्यानिमित्त त्यांनी विविध विकासकामांचेही उद्‌घाटन केले.

महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत मोदी म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नवीन इतिहास रचला जात आहे. फक्त एकाच शब्दात कुंभमेळ्याचे वर्णन करायचे झाल्यास मी ‘महायज्ञ’ हा शब्द वापरेन. महाकुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमामुळे देश व समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक संदेश जाईल.’

या वेळी मोदींनी भारतीय संस्कृतीबद्दल अनास्था व कुंभमेळ्यासह इतर तीर्थक्षेत्रांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पूर्वीच्या काँग्रेस सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘पूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या सरकारला भारतीय संस्कृतीबद्दल आस्था नव्हती. मात्र, आज केंद्र व उत्तर प्रदेशात संस्कृतीचा आदर करणारे सरकार आहे. डबल इंजिनचे सरकार कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची जबाबदारी पार पाडेल.’’

साडेपाच हजार कोटींची विकासकामे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षीच्या महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजमध्ये सुमारे साडेपाच हजार कोटींच्या प्रमुख १६७ विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. यात भाविकांशी संवाद साधणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्यक या चॅटबोटचाही तसेच रस्ते, उड्डाणपुलांसह प्रक्रिया न केलेला कचरा गंगा नदीत जाण्यापासून रोखणाऱ्या सांडपाणी प्रक्रियेसारख्या विकासकामांचा समावेश आहे. प्रमुख मंदिरांच्या कॉरिडॉरचेही पंतप्रधानांनी उद्‌घाटन केले.