बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नॉर्थ चोवीस परगणा जिल्ह्यातील सीमेवरून मायदेशी जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना सुरक्षा देणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान
बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झाल्यापासून हिंदू अल्पसंख्याकावर वाढत्या अत्याचाराने भारत, ब्रिटनसह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातील हिंसाचार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करायला हवा आणि तेथे शांतिसैनिक तैनात करावे, असे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील हिंदू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना बांगलादेशातील हिंदू समुदायातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात छळाचा सामना करणाऱ्या हिंदू नागरिकांना मायदेशी आणावे, असे आवाहन केले. या प्रश्नांत संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करायला हवा आणि तेथे शांतिसैनिक पाठविण्याचा निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हिंसाचारग्रस्त शेजारील देशात अल्पसंख्याकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत असेही त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या, "बांगलादेशातील इस्कॉनच्या पुजाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईसंदर्भात इस्कॉनच्या कोलकता शाखेच्या प्रमुखाशी मी चर्चा केली आहे. जर बांगलादेशात भारतीयांवर हल्ला केला जात असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणू शकतो. भारत सरकारकडून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रापुढे मांडता येऊ शकतो. त्यामुळे तेथे शांतता सैन्य पाठवता येऊ शकते."
बांगलादेशचे मच्छीमार भारतीय हद्दीत घुसले तेव्हा एक बांगलादेशी नौका उलटली. तेव्हा पश्चिम बंगालच्या सरकारने त्यांना मदत केल्याची आठवण ममता बॅनर्जी यांनी यावेळी करून दिली. त्या म्हणाल्या की, बांगलादेशात आमचे कुटुंब, नातेवाईक, मालमत्ता आहे. केंद्र सरकारकडून जो काही निर्णय घेतला जाईल, त्याला आमचा पाठिंबा असेल. "जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात धार्मिकतेच्या आधारावर अत्याचार होत असेल तर त्याची आम्ही निंदा करतो. पंतप्रधानांनी हस्तक्षेप करायला हवा आणि तसे आवाहन मी केंद्राला करत आहे," असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
सीमेवर साधूंचे आंदोलन
बांगलादेशातील हिंदू नेते चिन्मयकृष्ण दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील पेट्रापोल येथील बांगलादेश सीमेजवळ सुमारे एक हजार साधूंनी सोमवारी आंदोलन केले. पश्चिम बंगाल मधील विविध ठिकाणाहून हे साधू येथे दाखल झाले होते. अखिल भारतीय संत समितीने हे आंदोलन आयोजित केले होते. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि चिन्मयकृष्ण दास यांची सुटका करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी
सीमेपलीकडे गेल्या दहा दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असताना केंद्र सरकारने मौन बाळगले आहे. बांगलादेशच्या स्थितीत सक्रिय हस्तक्षेप करण्याबाबत भाजपचे नेते नेतृत्वाला का सांगत नाहीत ? याउलट त्यांचे नेते आपल्याच जमिनीवरून मालाची वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा करारानुसार मालवाहतूक बंद करणे आमच्या अधिकार कक्षेत येत नाही. आम्ही केवळ केंद्राच्या दिशानिर्देशांकानुसार काम करू शकतो.