भुज (गुजरात)
"सीमेवरील एक इंच भूमीबाबत देखील भारत तडजोड करू शकत नाही. देशाचे रक्षण करण्यासाठी आपले लष्कर देखील ताकदवान असावे अशी देशातील जनतेची भावना आहे. आज जेव्हा शत्रू राष्ट्र भारताच्या लष्कराकडे पाहतात तेव्हा त्यांना आपल्या मनसुब्यांचे काही खरे नाही असे वाटू लागते," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सर क्रीक येथे पंतप्रधानांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना मिठाईदेखील भरवली. मोदींनी यावेळी सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कर्मचाऱ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
"देश आणि परदेशातील भारतीय जेव्हा आपल्या लष्कराकडे पाहतात तेव्हा त्यांना आपला देश हा सुरक्षित असल्याची खात्री पटते. जेव्हा शत्रू आपल्या जवानांकडे पाहतो तेव्हा त्याला आपल्या मनसुब्यांचे आता काही खरे नाही असे वाटू लागते. सध्या केंद्रामध्ये देशाच्या एक इंचभर जमिनीसाठीही तडजोड न करणारे सरकार आहे." असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
आमचे सरकार हे लष्कराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे आहे. शत्रू राष्ट्र काय म्हणते? यावर आमचा काडीचाही विश्वास नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व लडाखमधील दोन संघर्षबिंदूंवरून भारत आणि चिनी लष्करादरम्यान झालेल्या समेटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाते. तत्पूर्वी याच मुद्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.
सीमापर्यटनाविषयी नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी
"देशाचे लष्कर, नौदल आणि हवाई दल हे तीन पूर्णपणे भिन्न विभाग असले तरीसुद्धा ते एकत्र येतात तेव्हा मात्र त्यांची क्षमता ही कैकपटीने वाढते. सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी सरकार वेगाने वाटचाल करत असून त्या विकास स्वप्नाचे तुम्ही संरक्षक आहात," असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोदींनी यावेळी कच्छमध्ये पर्यटनाच्या अमाप संधी असल्याचे सांगत सीमा पर्यटनाच्या पैलूवर फारशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले.