हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत ११६ भाविक मृत्युमुखी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी (सिकंदराराऊ ठाणा) येथे मंगळवारी धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. सर्व जखमींना एटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा १२२ पर्यंत पोहोचला आहे.

एटा आणि हाथरस या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांचा शेकडो एकर परिसरामध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता असे अलिगड रेंजचे महानिरीक्षक शलभ माथूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. योगी सरकारने या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.   

बाबांना सोडले, भक्त अडकले
फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांच्या एक दिवसीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. पावणेदोनच्या सुमारास हा सत्संग संपल्यानंतर शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडायला सुरूवात केली. यावेळी बाबांच्या सेवादारांनी भाविकांना रोखून धरले होते. आधी साकार हरी बाबा यांच्या ताफ्याला सोडण्यात आले. ऊन लागत असल्याने अनेक भाविकांनी येथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली. या रेटारेटीमध्ये अनेकजण बेशुद्ध पडले.

कोण आहेत संत भोले बाबा?
भोले बाबा मूळचे कांशीराम नगर (कासगंज) येथील पटियाली गावचा रहिवासी आहेत. यापूर्वी ते उत्तर प्रदेश पोलिसात भरती झाला होते, परंतु 18 वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी व्हीआरएस घेतली आणि त्यांच्याच गावात एका झोपडीत राहतात. उत्तर प्रदेश आणि जवळपासच्या राज्यांमध्ये फिरतात आणि लोकांना देवाच्या भक्तीचा धडा देतात.

भोले बाबा सांगतात  त्यांच्या जीवनात गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले.

यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानव कल्याणात घालवण्याचा निर्णय घेतला. संत भोले बाबा यांचा दावा आहे की ते स्वतः कुठेही जात नाहीत, तर भक्त त्यांना बोलावतात. त्यांनी सांगितले की भक्तांच्या विनंतीवर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरून सत्संग करीत असतात.

भोले बाबा यांचा दावा आहे की त्यांच्या भक्तांची आणि अनुयायांची संख्या लाखोंमध्ये आहे. प्रत्येक सत्संगात मोठ्या संख्येने अनुयायी येतात. काही वेळा एखाद्या सत्संगात त्यांच्या अनुयायांची संख्या ५० हजारापेक्षा जास्त होते. ते म्हणतात की ते नेहमी आपल्या अनुयायांना मानवतेच्या कल्याणाची शिकवण देतात आणि त्यांना मानवसेवा करून भगवंताशी जोडण्याची प्रेरणा देतात.

हाथरसमधील दुर्घटनेचे वृत्त ऐकून मला दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. जखमींना लवकर आराम पडो अशी प्रार्थना करते. - द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

या दुर्घटनेबाबत मी आताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पीडितांना सर्वोतपरी मदत करण्यात येईल. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

यूपी सरकारने हाथरसमधील पीडितांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मदत आणि बचाव कार्यासाठी पुढाकार घ्यावा. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते