दहशतवाद्यांपासून पर्यटकांचे रक्षण करताना सय्यद आदिलला आले वीरमरण

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 23 h ago
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला सय्यद आदिल हुसैन शाह. आणि त्याचे आई-वडील
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला सय्यद आदिल हुसैन शाह. आणि त्याचे आई-वडील

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका निष्पाप काश्मिरी मुस्लिम तरुणाचा बळी गेला. या तरुणाचे नाव आहे सय्यद आदिल हुसैन शाह. पहलगामजवळील अशमुकाम गावात राहणारा आदिल घोड्यावर पर्यटकांना फिरवण्याचे काम करायचा. मंगळवारी हल्ल्याच्या दिवशीही तो घोडे घेऊन पहलगामला गेला होता. 

या घटनेमुळे आदिल हुसैन शाहच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या घरात शोककळा पसरली आहे. आदिलची आई सतत धाय मोकलून रडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. ती आई रडताना पुन्हा पुन्हा हेच म्हणतेय की, "हाय अल्लाह, अब कैसे ज़िंदगी कटेगी... वही तो इकलौता कमाने वाला था.”

आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "हल्ला झाला त्यादिवशीही आदिल घोडे घेऊन पहलगामला गेला होता. दुपारी तीन वाजता बैसरन येथे हल्ला झाल्याची बातमी आम्हाला समजली. त्यानंतर आम्ही हुसैनला फोन लावला, परंतु त्याचा फोन बंद होता. आम्ही त्याला सतत फोन लावत राहिलो. अखेर साडेचार वाजता फोन सुरू झाला, पण कोणी उचलला नाही. त्यांतर मग पोलीस ठाण्यात गेलो. तिथे तक्रार नोंदवली. घरी परतलो तर समजले की त्याठिकाणी हल्ला झाला आहे. आमच्या दुसऱ्या मुलाने जाऊन पाहिले, तेव्हा हुसैन रुग्णालयात रक्तबंबाळ अवस्थेत होता." 

भावुक स्वरात हैदर शाह म्हणाले, "माझी तब्बेत कायम खालावलेली असते. आदिल घरातला एकमेव कमावता व्यक्ती होता. तो आमचा एकुलता एक आधार होता. घोडे भाड्याने देऊन तो कुटुंबासाठी पैसे कमवत होता. आता आमच्या उदरनिर्वाहाचे काय. त्याच्याशिवाय आमचे भविष्य काय, याची कल्पनाही करवत नाही. आम्ही कुणाकडे बघायचे? कोणाशी बोलायचे? आम्हाला न्याय हवाय. दहशतवाद्यांनी असे का केले? हुसैन निर्दोष होता. त्याला निर्घृणपणे मारले. हत्याऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे..."
 
आदिलच्या काकांनी सांगितले की, "तो घरातील सर्वात मोठा मुलगा होता. त्याची पत्नी आणि मुले आता उघड्यावर पडली आहेत. त्यांनी सर्व काही गमावले आहे. आमची सरकारला विनंती आहे की, त्यांनी आदिलच्या परिवाराला मदत आणि सुरक्षा पुरवावी."

आदिलने दहशतवाद्यांशी दिली झुंज 
काही प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितले की, आदिल पर्यटकांना घोड्यावर फिरवण्यासाठी बैसरनला गेला होता. हल्ल्याच्या वेळी तो तिथेच होता. दहशतवादी गोळ्या झाडून निर्दोष लोकांना मारत होते. हुसैनने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, हे काश्मीरचे पाहुणे आहेत. ते निरपराध आहेत. त्यांना मारू नका. दहशतवाद्यांनी त्याचे ऐकले नाही. मग हुसैन एका दहशतवाद्याशी भिडला. त्याने दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दहशतवाद्याने त्याच्यावरचं गोळी झाडली. त्यात हुसैनचा मृत्यू झाला.
 
सय्यद आदिल हुसैन शाह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर मंत्री, अधिकारी उपस्थित होते. पहलगाम वासियांनी साश्रू नयनांनी आदिलला शेवटचा निरोप दिला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter