विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा
टीम आवाज मराठी
पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता अतिरेकी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जण ठार झाले. यात दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्लेखोरांनी पर्यटकांवर जवळून गोळीबार केला. यामुळे मोठी मनुष्यहानी झाली.
सौदी दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान परतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. पहलगाममधील हल्ल्याची बातमी समजताच त्यांनी दौरा अर्धवट सोडला. मूळ नियोजनानुसार ते बुधवारी रात्री परतणार होते. पण त्यांनी मंगळवारी रात्रीच जेद्दाहवरून भारतासाठी उड्डाण केले. ते बुधवारी पहाटे दिल्लीत पोहोचले. सौदी अरेबियातील अधिकृत रात्रीच्या भोजनाला त्यांनी उपस्थिती टाळली. सौदी अरेबियातून परतताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली. हल्ल्याची माहिती घेतली.
विमानतळावरच उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पहाटे दिल्ली विमानतळावर पोहोचले. विमानतळावरच त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पहलगाम हल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा झाली. सकाळी 11 वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक होण्याचीही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये
हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी रात्री श्रीनगरमध्ये पोहोचले. ते थेट राजभवनात गेले. तिथे त्यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. शहा यांनी हल्ल्याची सविस्तर माहिती घेतली. ते बुधवारी पहलगामला भेट देणार आहेत. पीडित कुटुंबांची भेट घेतील. परिस्थितीचा आढावा घेतील.
पंतप्रधानांनी नोंदवला तीव्र शब्दांत निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी X वर लिहिले: मी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. बाधितांना सर्वतोपरी मदत दिली जात आहे. या जघन्य कृत्यामागील लोकांना कठोर शिक्षा देऊ. त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांचा वाईट हेतू यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे. तो आता बळकट झाला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter