…ते रक्तपिपासू दहशतवादी - मेजर मोहम्मद अली शाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 6 h ago
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पत्र लिहणारे मेजर मोहम्मद अली शाह
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पत्र लिहणारे मेजर मोहम्मद अली शाह

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. यातच मेजर डॉ. मोहम्मद अली शाह यांचे खुले पत्र वायरल होत आहे. 

या पत्रात मेजर लिहतात, पहलगाममधील भ्याड हल्ल्याने माझं मन सुन्न झालं आहे. रात्रीचा बराच वेळ उलटला तरी झोप लागत नाही. माझ्या मायभूमीत निरपराध लोकांचा खून करणाऱ्या दहशतवाद्यांप्रती मनात राग आहे. मी एक भारतीय मुस्लिम आहे. देशावर प्रेम करणारा आणि एकतेत विश्वास ठेवणारा माणूस. दहशतवाद्यांनी पहलगाममधील लोकांवर हल्ला केला. पण खरं तर त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला घायाळ केलं.” 

आम्ही आधी भारतीय 
मेजर पुढं लिहतात, “मी फक्त स्वत:साठी नाही, तर माझ्या कुटुंबासाठी बोलतो. माझ्या घरात देशसेवेची परंपरा आहे. माझे वडील, लेफ्टनंट जनरल झमीर उद्दिन शहा, भारतीय लष्कराचे उपप्रमुख होते. निवृत्तीनंतर त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मुस्लिम समाजाला दिशा दिली. माझे काका, अभिनेते नसीरुद्दिन शहा, यांना पद्मश्री आणि पद्मभूषण मिळाले. माझ्या दुसऱ्या काकांना आयआयटीमधील योगदानासाठी राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. आमच्या कुटुंबाला नेहमीच मान मिळाला. आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही आधी भारतीय आहोत मग बाकी काही.” 

या पत्राच्या मध्यमातून ते पुढे म्हणतात, “पहलगामच्या खोऱ्यात मी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण केलं. ‘हैदर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘मोझी’ आणि ‘अवरोध’ या मालिकेत मी कमांडोची भूमिका केली. या सगळ्या कलाकृती काश्मीरच्या मातीत चित्रीत झाल्या. मी तिथल्या शांत नद्या, स्वच्छ हवा आणि सुंदर डोंगर अनुभवले. तिथल्या लोकांमधली एकता पाहिली. मी जगभरातील TEDx व्याख्यानांत भारताच्या आत्म्याचं वर्णन केलं. त्याचं वैविध्य आणि सांस्कृतिक श्रीमंती सांगितली. पण दहशतवाद्यांनी त्या आत्म्यावरच घाव घातला.” 

आमचा निर्धार आणखी मजबूत झाला
मेजर मोहम्मद अली शाह यांनी पुढं दहशतवाद्यांना उद्देशून म्हटलं, “दहशतवाद्यांच्या गोळ्या काश्मीरचं सौंदर्य नष्ट करू शकत नाहीत. त्यांचा द्वेष एकता मिटवू शकत नाही. पहलगाम फक्त ठिकाण नाही तर भारताच्या मूल्यांची ओळख आहे. दहशतवाद्यांच्या रक्तरंजित हल्ल्याने आम्ही कमजोर झालो नाही. उलट आमचा निर्धार वाढला.” 

ते पुढं लिहतात, “तुम्ही कोणासाठी लढता? इस्लामसाठी? काश्मीरसाठी? खोटं बोलू नका. तुम्ही स्वातंत्र्यसैनिक नाही. तुम्ही भ्याड आहात. बंदुकी आणि मुखवट्यामागे लपणारे कसाई आहात.  तुम्ही लष्कराच्या तळाला हात लावण्याची हिंमत केली नाही. तुम्ही निशस्त्र पर्यटक, लहान मुलं, माता, नवविवाहित जोडप्यांवर हल्ला केला. याला तुम्ही जिहाद म्हणता? हा जिहाद नाही. हे पाप आहे. रक्तपात आहे. माणुसकी आणि अल्लाहचा अपमान आहे. तुम्ही इस्लामचं नाव रक्ताने माखलं. शांतीचा धर्म असणाऱ्या इस्लामला तुम्ही दहशतवादाचं हत्यार बनवलं. तुम्हाला लाज वाटायला हवी.” 

इस्लाम कोणालाही मारण्याची परवानगी देत नाही. 
मेजर शाह पुढं म्हणतात, “मला लाज वाटते की तुम्ही (दहशतवादी) आणि मी एकाच धर्मात जन्मलो. पण आमच्यात काहीच साम्य नाही. माझा धर्म माणुसकीचा आहे. माझा इस्लाम निरपराधांचं रक्षण करण्याची शिकवण देतो. तसेच देशसेवा करण्यासाठी सांगतो. मात्र दहशतवादी इस्लामचे नाव वापरुन संतापजनक कृत्य करतात. यामुळे धर्म बदनाम होतो. ते धर्माच्या नावाखाली रक्तपात करतात.” 

दहशतवाद्यांमुळे देशप्रेमी मुस्लिमांना खुलासे द्यावे लागतात
दहशतवाद्यांमुळे भारतीय मुस्लिमांना एक ओझं सहन करावं लागतं. यावसीआह्यी ते म्हणतात “आसपासच्या लोकांनी मुस्लिम नाव ऐकलं किंवा टोपी पहिली की त्यांच्या डोळ्यात संशय दिसतो. दहशतवाद्यांमुळे देशप्रेमी मुस्लिमांना खुलासे द्यावे लागतात. आम्ही कधीच न केलेल्या गुन्ह्यांसाठी माफी मागावी लागते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त जीव घेतले नाहीततर विश्वास हिसकावण्याचा प्रयत्न केला. भारतीय मुस्लिमांना त्यांच्या देशावर मोकळेपणाने प्रेम करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत दहशतवादी अपयशी ठरले आणि पुढेही ठरतील.”

ते फक्त रक्तपिपासू दहशतवादी 
या पत्राचा शेवट करताना मेजर शाह भारतीयांना म्हणतात, “आम्ही खरे मुस्लिम आणि भारतीय आहोत. आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्हीदेखील इतरांप्रमाने संतापलो आहोत. मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ते दहशतवादी आहेत. माणुसकीवरचा डाग आहेत. पण भारताची  एकता आणि विचार अमर आहे. त्यांनी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवाद्यांच्या गोळ्या आपल्याल गप्प बसवू शकत नाही. दहशतवादी आमची भारतीय असण्याची ओळख बदलू शकत नाही. दहशतवादी कोणत्याही धर्माचे नसून फक्त रक्तपिपासू दहशतवादी आहेत. त्यांनी काश्मिरवर नाही तर आपल्यावर हल्ला केला आहे. आपण एक राष्ट्र म्हणून, भारतीय म्हणून पुन्हा उभं राहू.” 

जय हिंद.
मेजर डॉ. मोहम्मद अली शाह

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter