पहलगाम हल्ल्यातून मराठी कुटुंबाला वाचवणारा टॅक्सी चालक आदिल
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 12 h ago
पहलगाम हल्ल्यादरम्यान टॅक्सी चालक आदिलने वाचवले महाराष्ट्राच्या कुटुंबाचे प्राण
“एका व्यक्तीची चूक आणि संपूर्ण काश्मीरला शिक्षा. हा तर माणुसकीचा खून आहे. यामुळे आमची बदनामी तर झालीच, पण आमचा रोजगारही हिरावला गेला.” हे हृदयद्रावक शब्द आहेत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील स्थानिक टॅक्सी चालक आदिलचे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आपली व्यथा मांडली.
आदिल हाच तोच माणूस आहे, ज्याने हल्ल्यादरम्यान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुण्यातील एका कुटुंबाला गोळीबारातून वाचवले. त्यांना आपल्या घरी नेऊन त्याने सुरक्षित आश्रय दिला आणि जेवू घातले. हा व्हिडिओ पुणे शहरातील काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे कुटुंब आदिलच्या शौर्याची आणि माणुसकीची मनापासून प्रशंसा करत आहे.
व्हिडीओमध्ये रुपाली ठोंबरे म्हणत आहेत, “हे आहेत आदिल भाई आहेत. या टॅक्सी चालकाने आम्हाला आपल्या घरी नेले. त्याने आम्हाला जेवण दिले, सुरक्षित ठेवले. सकाळपासून तो आम्हाला धीर देत आहे, घाबरू नका म्हणत आहे.”
आदिलची वेदना
या व्हिडीओत आदिल म्हणतो, “या एका घटनेमुळे संपूर्ण काश्मीर खोरे बदनाम झाले. काश्मीरची अर्थव्यवस्था, आमचा पर्यटन व्यवसाय, सगळं उद्ध्वस्त झालं. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून मोठ्या हॉटेलांपर्यंत सगळ्यांचे नुकसान होणार आहे.”
तो पुढे म्हणतो, “निष्पाप मुले आपल्या कुटुंबांसह फिरायला आली होती. त्यांना काय माहीत होते, त्यांच्यासोबत असं काही घडेल? आता याचा परिणाम संपूर्ण काश्मीरवर होईल. आमचा रोजगार गेला, व्यवसाय गेला. आम्ही या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात आहोत.”
देशभरात संतापाचे वातावरण
या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. काश्मीरमधील इस्लामिक समुदायाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि शांततापूर्ण बंदचे आवाहन केले. मुंबईसह देशाच्या अनेक भागांत नागरिक आणि धार्मिक संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.
भारताचा कठोर पवित्रा
या घटनेनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर आणि दंडात्मक पावले उचलण्याची घोषणा केली. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून नियंत्रण रेषेवर सावधानता वाढवली आहे.
दहशतवादाने काश्मीर खोऱ्यातील शांततेवर घाव घातला असला, तरी आदिलसारखे लोक हे सिद्ध करतात की माणुसकी अजूनही जिवंत आहे. काश्मीर आज दुखात आहे, पण आपल्या लोकांच्या माणुसकीमुळे आशाही कायम आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -