जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने विशेष पत्रकार परिषद घेतली. हल्ल्यामागे सीमेपलीकडील संघटना असल्याचं कॅबिनेट सुरक्षा समितीला सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ही माहिती काल सायंकाळी माध्यमांना दिली.
मिस्री यांनी सांगितलं, “पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याची सविस्तर माहिती समितीला देण्यात आली. जगभरातील अनेक सरकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता दाखवणाऱ्या या पाठिंब्याचं समितीने कौतुक केलं.”
पुढे ते म्हणाले, “हल्ल्यामागे सीमेपलीकडील संघटना असल्याचं समितीसमोर मांडण्यात आलं. केंद्रशासित प्रदेशात यशस्वी निवडणुका आणि आर्थिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला. परराष्ट्र मंत्रालयानुसार, या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.”
हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कॅबिनेट सुरक्षा समितीची दोन तासांहून अधिक काळ बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. मंगळवारी अमित शहा यांनी श्रीनगर येथे सुरक्षा आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पहलगाममधील बैसारण मेदानातील हल्ल्याच्या ठिकाणाला भेट दिली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जम्मू-काश्मीर पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी हल्ला झाला त्याठिकाणी भेट दिली. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हा हल्ला २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला केवळ निर्दोष नागरिकांचा बळी घेणारा नाही, तर जम्मू-काश्मीरच्या प्रगतीला खीळ घालण्याचा कुटील डाव आहे. नुकत्याच केंद्रशासित प्रदेशात निवडणुका यशस्वी झाल्या असून त्याठिकानच्या आर्थिक विकासाला गती मिळत आहे. अशा वेळी हा हल्ला शांतता आणि स्थैर्याला आव्हान देणारा आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter