नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र शासित झालेल्या या प्रदेशातील हे पहिले निवडून आलेले सरकार आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओमर हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. आजोबा शेख अब्दुल्ला आणि वडील फारूक अब्दुल्ला यांच्यानंतर अब्दुल्ला कुटुंबातील तिसऱ्या पिढीलाही ओमर यांच्या रूपाने काश्मीरचे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे आयोजित समारंभात मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी पदाची शपथ घेतली. त्यात साकीना मसूद (इतू), जावेद दर, जावेद राणा, सुरिंदर कुमार चौधरी आणि सतीश शर्मा यांचा समावेश आहे. यावेळी उपमुख्यमंत्री पदाची माळ सुरिंदर कुमार यांच्या गळ्यात पडली.
ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर अनेक नेते उपस्थित होते. उपस्थित होते. शपथविधी समारंभापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मुहम्मद अब्दुल्ला यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने तब्बल ४२ जागा जिंकल्या. तर आघाडीतील काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. ९५ सदस्यांच्या सभागृहात दोन्ही पक्षांचे बहुमत आहे. मात्र चार अपक्ष आणि आम आदमी पक्षाच्या (आप) एकमेव आमदारानेही नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला.
सरकारमध्ये कॉंग्रेसचा नसणार सहभाग
निवडणुक सोबत लढवली असली तरी सरकारमध्ये कॉंग्रेसचा सहभाग नसणार आहे. जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटी (जेकेपीसीसी) प्रमुख तारिक हमीद कारा यांनी सांगितले की, 'काँग्रेस पक्ष सध्या जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सामील होणार नाही. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची काँग्रेसने केंद्राकडे जोरदार मागणी केली आहे. पंतप्रधानांनी जाहीर सभांमध्येही अनेकदा हे आश्वासन दिले आहे. मात्र जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. यामुळेच सध्या आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही.
शपथविधीपूर्वी ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य
शपथविधीपूर्वी ओमर अब्दुल्ला म्हणाले, “सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा मी शेवटचा मुख्यमंत्री होतो. आता मी केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचा पहिला मुख्यमंत्री होणार आहे. मला खूप आनंद झाला आहे. मला आशा आहे की काश्मीरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा तात्पुरता असेल. आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. आणि यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे हा आहे."