विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत सारकाही आलबेल नाही, हे या आघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आता आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटले की, दुर्दैवाने इंडिया आघाडीची कोणतीही बैठक होत नाही. कोणतेही धोरण नाही आणि नेतृत्वही नाही. इंडिया आघाडीच्या अस्तित्वाबाबत कोणतीही स्पष्पटता देखील नाही.
त्यांनी पुढे म्हटले की, जिथपर्यंत मला आठवतं की इंडिया आघाडीसाठी कोणतीही कालमर्यादा नव्हती. जर आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच होते, तर इंडिया आघाडीला आता संपवलं पाहिजे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या दरम्यान इंडिया आघाडीतील मित्र पक्ष आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये एकजुट दिसत नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. पंजाबमध्येही लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावर अब्दुल्ला यांनी म्हटले की, दिल्लीत काय होत आहे. मी याबद्दल काहीच सांगू शकत नाही. दिल्ली निवडणुकीशी आमचं काही घेणंदेणं नाही. त्यांनी स्पष्टच सांगतितलं की, जर विरोधी पक्षांमध्ये एकजुट नाही तर इंडिया आघाडीला भंग केले पाहिजे.
ममता बॅनर्जी तर आघाडीपासून आधीच अलिप्त झाल्या आहेत. अरविंद केजरीवालही आघाडीच्या सोबत दिसत नाहीत. अखिलेश यादव यांनी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. तर ममता बॅनर्जींनी या आधीच काँग्रेसच्या ईव्हीएमच्या मुद्य्यावरून काँग्रेसलाच सुनावलेलं आहे. आता उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, ईव्हीएमबाबत रडणं ठीक नाही. विजयी झाले तर सगळं काही चांगलं आणि पराभूत झालं तर ईव्हीएम दोषी ठरवलं जातं.
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती होती. निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट होती. काँग्रेस केवळ सहा जागाच जिंकू शकली. तर नॅशनल कॉन्फरन्सने चांगली कामगिरी केली आणि बहुमताने सरकार बनवलं.