अधिकृत मदरशांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार मदत

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

‘सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे’, असे डॉ. आंबेडकरांनी एका सभेत म्हटले होते. अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लिम समाजातील सामाजिक समस्या दूर करण्यासाठी मुस्लिम  विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा टक्का वाढणे आवश्यक आहे. हा टक्का वाढवा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.  मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. 

नुकतेच अल्पसंख्यांक विकास विभागाने सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्हयातील अल्पसंख्यांक बहुल शाळांना आणि डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये पात्र मदरशांना  दि. २२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबई उपनगर जिल्हयातील “धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनु‌दानित, विनाअनुदानित, कायमविना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. 

या योजनांचा उद्देश अल्पसंख्यांक बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा आहे. तसेच त्यांच्यासाठी शाळेमध्ये उत्तम वातावरण निर्माण करणे आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करणे आहे. 

या योजनेअंतर्गत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या शाळांना विविध पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी अनुदान मिळवता येईल. यामध्ये शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण, लॅबोरेटरीची सुविधा, खेळाची जागा, शौचालय आणि इतर आवश्यक सुविधांचा समावेश आहे. यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये ७०% आणि अपंग शाळांमध्ये ५०% विद्यार्थ्यांचा अल्पसंख्यांक समुदायातील असणे अनिवार्य आहे. यासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांना मान्यता असलेली असणे आवश्यक आहे. स्वंय-अर्थसहाय्यित शाळा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 

योजनेच्या अनुदानात वाढ 
या योजनेत अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांना रु. २ लाख अनुदानाच्या ठिकाणी रु. १० लाख पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. जर अनुदानित रक्कम पूर्णपणे प्रशासनाने खर्च केली तर निश्चितच अल्पसंख्यांक समाजाचा शिक्षणाचा टक्का वाढण्यास मदत होईल.   

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना
मदरशांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर इतर विषयांचे शिक्षण मिळावे. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ही योजना शासनाने आणली. या योजनेनंतर्गत मदरशांना आधुनिकीकरणासाठी, पायाभूत सुविधांसाठी आणि ग्रंथालयासाठी देण्यात येते. या योजनेनंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमुळे त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होत आहे.
  
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत, पात्र मदरशांना पायाभूत सुविधांसाठी १० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवता येणार आहे. या योजनेचा लाभ धर्मादाय आयुक्त किंवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना मिळणार आहे. ‘Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM)’ अंतर्गत लाभ घेतलेल्या मदरशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनांमुळे अल्पसंख्याक बहुल शाळांना आणि मदरसांना पायाभूत सुविधांची जोड देऊन त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचवण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर शाळांच्या गुणात्मक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

राज्य शासनाच्या या योजनांचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अटी व शर्तीची पूर्तता करणा-या शाळांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यात अर्ज सादर करताना, शाळांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्तर मदरशांना मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाचे नमुने आणि योजनेची अधिक माहिती https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

-फजल पठाण 
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter