राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा फ्रान्स दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यावर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण चर्चा केल्या. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील Horizon 2047 रोडमॅपच्या कटिबद्धतेचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांच्या दृष्टीने 2047 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा शताब्दी सोहळा असणार आहे. सोबतच भारत-फ्रान्स कूटनीतिक संबंधांची शताब्दीही सणार आहे. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीची 50 वर्षेही त्याचवेळी पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे.
फ्रान्स दौऱ्यात डोवाल यांनी फ्रान्सच्या सशस्त्र दलांचे मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांच्याशी देखील महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेत राफेल मरीन आणि स्कॉर्पीन पाणबुडी यांविषयीच्या महत्त्वपूर्ण संरक्षण करारांवर चर्चा करण्यात आली. तसेच, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये सहकार्य वाढवणे आणि युक्रेनमधील आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही यावेळी दोघांमध्ये विचारविनिमय झाला. दोन्ही देशांनी विविध विषयांवरील आपले सहकार्य अधिक मजबूत करण्याचे मान्य केले आहे.
फ्रान्सचे सशस्त्र दलांचे मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या भेटीची पुष्टी करताना संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले. त्याचबरोबर युक्रेनमधील आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे सांगितले
डोवाल यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य नवीन उंचीवर घेऊन जाणारा ठरला आहे. विशेषत: मेक इन इंडिया उपक्रमास चालना देण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. याशिवाय, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांच्या सहकार्याचा विस्तार करण्याच्या दिशेने पावले उचलली जाणार असल्याची ग्वाहीही या निमित्ताने देण्यात आली.
या दौऱ्यामुळे भारत-फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल होईल असे मानले जात आहे. जागतिक स्थैर्य आणि सुरक्षिततेवर या दौऱ्याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे