NSA अजित डोवाल रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
व्लादिमीर पुतिन  अजित डोवाल
व्लादिमीर पुतिन अजित डोवाल

 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे येत्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. मॉस्को येथे ब्रिक्स गटाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद होणार असून त्या बैठकीला दोवाल उपस्थित असतील. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या युक्रेन आणि रशियाच्या दौऱ्यानंतर लगेचच दोवाल यांचा हा दौरा होत असल्याने यावेळी युक्रेनच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या रशिया आणि युक्रेन दौऱ्यात दोन्ही देशांच्या प्रमुखांना 'शांतता अपरिहार्य' असल्याचे सांगितले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी दोन दिवसांपूर्वीच 'भारत, ब्राझील आणि चीन या मित्रदेशांपैकी कोणी मध्यस्थी केल्यास शांततेसाठी तयार' असल्याचे जाहीर केले होते. 

मॉस्कोमध्ये होणाऱ्या परिषदेतमध्ये रशियासह या तिन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार उपस्थित असतील आणि त्यामुळे युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळे दोवाल हे रशियाच्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे युक्रेनमधील शांततेबाबत चर्चा करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दौऱ्यात डोवाल आपल्या रशियन समकक्ष आणि ब्रिक्सच्या इतर सदस्य देशांच्या प्रतिनिधींना भेटतील. यामध्ये जुलैमध्ये मॉस्को शिखर परिषदेत झालेल्या चर्चेच्या आधारे पुढील रणनीती ठरवता येईल. सौदी अरेबिया, यूएई, इराण, इजिप्त आणि इथिओपिया हे नवीन पाच सदस्य देश या गटात सामील झाल्यानंतर प्रथमच ही BRICS NSA बैठक होत आहे.

युक्रेन-रशियामधील युद्ध थांबविण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले होते, त्याचाच हा भाग असल्याचे मानले जात आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांच्याशी शनिवारी (ता. ७) चर्चा करताना, संघर्षावर तोडगा काढण्यात भारत आणि चीन हे महत्त्वाची भूमिका निभावू शकतील, असे सांगितले होते.
 
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा रशिया दौरा या कारणांमुळे आहे महत्त्वाचा - 
 

1. भारत-रशिया संबंधांचे बळकटीकरण : रशिया आणि भारत यांच्यात ऐतिहासिकदृष्ट्या चांगले संबंध राहिले आहेत. विशेषत: संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात हे संबंध आणखी सुदृढ होत आहेत. या दौऱ्यात या संबंधांचा आढावा घेऊन त्यांना नवीन गती देणे अपेक्षित आहे.

2. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य: रशिया हा भारताचा महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. या दौऱ्यात सामरिक आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी चर्चा होईल. विशेषत: भारताच्या "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उत्पादनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

3. जिओपॉलिटिकल परिस्थिती: सध्याच्या जागतिक परिस्थितीत युक्रेन युद्ध आणि चीनचा वाढता प्रभाव हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक चर्चा होऊ शकतात. भारताच्या स्वातंत्र्यपूर्ण परराष्ट्र धोरणाला अनुसरून डोवाल यांचा दौरा या क्षेत्रातील स्थिरतेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

4. *आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहकार्य*: BRICS, SCO (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) सारख्या बहुपक्षीय संस्थांमध्ये भारत आणि रशिया एकत्र काम करत आहेत. या दौऱ्यात या संस्थांच्या माध्यमातून परस्पर सहकार्य वाढवण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा हा दौरा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक पातळीवरील भारताच्या भूमिकेला महत्त्व देण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे.

काय म्हणाले होते राष्ट्राध्यक्ष पुतिन?
रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू आहे. अनेक देशांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनीही या प्रदेशात सुरू असलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी कबुली दिली होती. इस्तंबूल चर्चेदरम्यान ज्या करारांवर सहमती झाली आणि ज्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही ते भविष्यातील शांतता चर्चेचा आधार बनू शकतात यावर पुतिन यांनी भर दिला. पुतिन यांनी युक्रेन संघर्षावर भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थी करू शकताता असे म्हणाले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter