आता बदलणार केरळ राज्याचे नाव

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 13 d ago
केरळ विधानसभा
केरळ विधानसभा

 

राज्य आणि देशतील अनेक शहरांची आणि जिल्ह्यांची नावे संविधांच्या आठव्या अनुसूचिचा वापर करून बदलण्यात आली आहेत. आता केरळ राज्याचे नाव बदलण्यात येणार आहे. नुकताच केरळ विधानसभेत दुसऱ्यांदा नाव बदलण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता नाव बदलासाठी केंद्रीय गृहखात्याच्या मंजुरीची प्रतिक्षा असून गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा प्रस्ताव मंजूर झाला होता.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावात त्यांनी, “संविधानाच्या आठव्या अनुसुचीनुसार केरळ राज्याचे नाव केरळम असे करण्यात यावे. मल्याळम भाषेत केरळला केरलम असे संबोधले जाते. मल्याळी भाषिकांसाठी एकीकृत केरळ बनवण्याची मागणी स्वातंत्र्य संग्रामापासूनच होत होती. पण संविधानाच्या पहिल्या अनुसुचित आमच्या राज्याचे नाव केरळ असे लिहिलेले आहे. त्यामुळे ही विधानसभा केंद्र शासनाला विनंती करते की संविधानाच्या कलम तीननुसार राज्याचे नाव बदलून केरळम करण्यात यावे, असे म्हंटल आहे.”

गेल्या वर्षी मंजूर झालेला प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. पण केंद्राने यामध्ये काही तांत्रिक बदल सुचवले होते. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या प्रस्तावात काही बदलांची गरज असल्याचे विधानसभेला सांगितले. यामुळे या नव्या प्रस्तावाला सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधीपक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ आघाडीनं एकमतानं या प्रस्तावाला मंजुरी दिली.यानंतर विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमसीर यांनी बहुमताने नवा प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे घोषित केलं.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून केरळ राज्याला नवे नाव मिळणार आहे.

नाव बदलण्याची प्रक्रिया?
संबंधित शहरे, जिल्हे आणि राज्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा त्या सरकारकडे असतो. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून हा निर्णय मंजूर करून घ्यावा लागतो. मंजूर प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येतो. केंद्रीय गृह मंत्रालय यासंदर्भात इतर संबंधित मंत्रालय आणि संबंधित विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतं. NOC मिळाल्यानंतर गृह मंत्रालय नामांतरासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देतं.

केंद्र सरकारने बदललेली प्रमुख शहर-जिल्ह्यांची नावे
पूर्वीचं नाव - बदललेलं नाव


औरंगाबाद - छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)

उस्मानाबाद - धाराशिव (महाराष्ट्र)

बंगलोर - बंगळुरू (कर्नाटक)

मंगलोर - मंगळुरू (कर्नाटक)

म्हैसूर - म्हैसुरू (कर्नाटक)

गुलबर्गा - कलबुर्गी (कर्नाटक)

हुबळी - हुब्बळी (कर्नाटक)

शिमोगा - शिवमोगा (कर्नाटक)

चिकमंगळूर - चिक्कमंगळुरू (कर्नाटक)

बेल्लारी - बळ्ळारी (कर्नाटक)

बिजापूर - विजयपुरा (कर्नाटक)

हॉस्पेट - होसपेटे (कर्नाटक)

तुमकूर - तुमकुरू (कर्नाटक)

राजमुंद्री - राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश)

गुडगाव - गुरुग्राम (हरयाणा)

अलाहाबाद - प्रयागराज (उत्तर प्रदेश)

न्यू रायपूर - अटल नगर (छत्तीसगढ)

होशंगाबाद - नर्मदापुरम (मध्य प्रदेश)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter