भारतात पूर्वीपासून धार्मिक शाळांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची पद्धत आहे. मुस्लिम समजातही मदरशांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण मोठे आहे. मुस्लिमांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक शिक्षण देण्याची जागा म्हणजे मदरसा. अलीकडे मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणावर बोट ठेवले जाते. परंतु उत्तराखंडमधील आधुनिक मदरसा आता सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकतेच उत्तराखंडमध्ये देशातील पहिला मुस्लिम मदरसा उभारण्यात आला आहे. या मदरशामध्ये शाळेप्रमाणेच सर्व विषय शिकवले जाणार आहेत. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी या संदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, “देहरादूनच्या रेल्वे स्थानकाजवळ मुस्लिम वसाहतीत सुमारे 50 लाख रुपयांच्या खर्चाने आधुनिक मदरसा तयार करण्यात आला आहे. देशातील या पहिल्या आधुनिक मदरशाचे नाव ‘डॉ एपीजे अब्दुल कलाम मॉडर्न मदरसा’ ठेवण्यात आले आहे. येत्या मार्च महिन्यापासून हा मदरसा विद्यार्थ्यांसाठी खुला केला जाणार आहे.”
मदरशातील विद्यार्थी होणार डॉक्टर इंजिनियर
उत्तराखंडमधील या आधुनिक मदरस्याच्या नजीक क्षेत्रात दहा मदरसे आहेत. परंतु या भागातील सर्वात मोठा मदरसा आता अत्याधुनिक करण्यात आला आहे. यामुळे आता दहाही मदारशांतील मुलांना आधुनिक मदरश्यात आणले जाणार असल्याची माहिती आहे. याविषयी बोलताना उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स म्हणतात, “हो हे खरे आहे. त्या दहा मदारशांतील मुलांना आधुनिक मदरश्यात आणण्यात येणार आहे. कारण आधुनिक मदरश्यात मोठी वर्गखोली करण्यात आली आहे. त्यात फर्निचर, संगणक आणि स्मार्ट बोर्ड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आसपासच्या मदरशांना बंद करून, तेथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आता या आधुनिक मदरशात एकाच ठिकाणी शिकवले जाईल.”
आधुनिक मदरश्यात धार्मिक शिक्षणाबरोबरच सर्व विषय शिकवले जाणार आहेत. अरबी व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना पर्यायी भाषा म्हणून संस्कृत शिकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आता विद्यार्थी मदरशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुसरे शिक्षण घेऊ शकतील. तसेच इतर विद्यार्थ्यांप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर आणि सरकारी कर्मचारी देखील बनू शकतील.
उत्तराखंडमध्ये १० आधुनिक मदरसे तयार होणार?
उत्तराखंड सरकारने मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणावर आणि कामकाजावर लक्ष देत आहे. तसेच अवैध मदरशांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. यातच आता शादाब यांनी उत्तराखंडमध्ये आणखी आठ ते दहा आधुनिक मदरसे निर्माण होणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात, “सध्या एह एक आधुनिक मदरसा सुरू करण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्यातील आठ ते दहा मदरशांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. वक्फ बोर्ड यासंदर्भात योजना आणण्याच्या तयारीत आहे.”
पुढे ते म्हणतात, “राज्यात काही अवैढ मदरसे सुरू आहेत. तसेच काही छोटे मोठे मदरसे आहेत. या मदरशांना एकत्र आणून नोंदणीकृत मदरशांमध्ये समाविष्ट करत त्यांचे आधुनिकीकरण केले जाईल. यामुळे मदरशांचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ दर्जाचे शिक्षण मिळेले. यामध्ये विद्यार्थ्यांना सकाळपासून दुपारपर्यंत सीबीएसईच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाईल. तर संध्याकाळी विद्यार्थी त्याच्या आवडीच्या विषयांवर शिकू शकतील. यामुळे सर्व मुलांना समान शिक्षण आणि प्रगतीची समान संधी मिळेल. यामागचा आमचा उद्देश एक सुंदर भारत निर्माण करणे आहे.”
मोफत शिक्षण मदरशाचे अभिनव उपक्रम
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या आगामी संकल्पनेविषयी सांगताना ते म्हणतात, “या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येईल. तसेच वक्फ बोर्डातर्फे विद्यार्थ्यांसाठी गणवेश आणि शिक्षणासाठी पुस्तके देण्यात येतील. शिवाय पहिल्यांदाच मदरशांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी पूर्व सैनिकांची भरती केली जाईल. हे पूर्व सैनिक विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवतील आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण करतील. विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती देखील केली जाईल.”