विजय मल्ल्याविरोधात निघाले अजामीनपात्र वॉरंट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
विजय मल्ल्या
विजय मल्ल्या

 

मुंबईतील एका विशेष न्यायालयाने कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात (Vijay Mallya) अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. हे अजामीनपात्र अटक वॉरंट विजय मल्ल्याविरुद्ध इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित १८० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणाशी संबंधित आहे. न्यायालयाने २९ जून रोजी विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र हे आदेश सोमवारी उपलब्ध झाले. सोमवारी सविस्तर आदेशाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली.

सीबीआयचा युक्तिवाद, कागदपत्रे आणि आरोपी फरार असल्याची दखल घेत न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी हे योग्य प्रकरण असल्याचे सांगितले. न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि विजय मल्ल्या फरार असल्याच्या आधारावर सांगितले की, 'हे प्रकरण विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. जेणेकरून त्याची न्यायालयात उपस्थिती सुनिश्चित करता येईल.'

सीबीआयने न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, 'दिवाळखोर एअरलाइन्स किंगफिशरचे प्रवर्तक विजय मल्ल्याने सरकारी बँकेकडून घेतलेल्या १८० कोटी रुपयांच्या कर्जाची जाणीवपूर्वक परतफेड केली नसल्याचे तपासातून समोर आले आहे. विजय मल्ल्याला यापूर्वीच ईडीकडून चौकशी करण्यात येत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फरार घोषित करण्यात आले आहे. सध्या तो लंडनमध्ये असून भारत सरकार ब्रिटिश सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याने २००७ ते २०१२ दरम्यान तत्कालीन किंगफिशर एअरलाइन्ससाठी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून १८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तपास एजन्सी सीबीआयने सांगितले की, २०१० मध्ये आरबीआयने एसबीआय बँकेला किंगफिशर एअरलाइन्सच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एकरकमी रकमेच्या प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेसह १८ बँकांच्या कन्सोर्टियमने किंगफिशर एअरलाइन्ससोबत MDRA करार केला.

विजय मल्ल्याने जाणूनबुजून फसवणुकीच्या उद्देशाने कर्ज परतफेडीचे दायित्व पूर्ण केले नाही, असा आरोप आहे. यामुळे बँकेचे १४१.९१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि कर्जाचे शेअर्समध्ये रुपांतर केल्यामुळे ३८.३० कोटी रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले. माजी राज्यसभा खासदार विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारत सोडला. जानेवारी २०१९ मध्ये मल्ल्याला अनेक कर्ज थकबाकी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते.