टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 d ago
नोएल टाटा
नोएल टाटा

 

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जाबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आणि नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव नोएल टाटा यांचे नाव टाटा समूहाचे वारसदार म्हणून आघाडीवर होतं. नोएल हे सध्या ट्रेंट लिमिटेड आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

दिवंगत रतन टाटा यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी टाटा ट्रस्टने शुक्रवारी सकाळी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत नोएल टाटा यांच्याकडे टाटा ट्रस्टची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. नोएल टाटा हे आधीपासून सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त आहेत. त्यांच्याकडे टाटा सन्सची ६६% मालकी आहे.

नोएल टाटा यांनी यूकेच्या ससेक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी फ्रान्सच्या INSEAD बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. नोएल टाटा यांनी टाटा सन्समधील सर्वात मोठे भागधारक आणि सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्याशी लग्न केले आहे.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे नेतृत्व कोण करणार, याबाबतीत चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आली होती. रतन टाटा यांच्याकडे वैयक्तिकरीत्या तीन हजार ८०० कोटींची मालमत्ता आहे. टाटा यांच्या एकूण उत्पन्नापैकी ६६ टक्के भाग हा टाटा ट्रस्ट व त्याअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांमधून येतो. टाटा ट्रस्ट हे टाटा सन्सचा भाग असून त्याअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रतन टाटा यांना मूलबाळ नसल्याने वारसदार म्हणून टाटा घराण्यातील काही नावे चर्चेत होती.

रतन टाटा आणि नोएल टाटा यांचं नातं काय?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा यांनी दोनदा लग्न केले होते. पहिले लग्न सुनी कमिश्रिएट यांच्याशी झाले होते. रतन टाटा आणि जिमी टाटा अशी सुनी आणि नवल टाटा यांच्या दोन मुलांची नावे आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर नवल टाटा यांनी 1955 मध्ये स्विस उद्योगपती सिमोनशी लग्न केले. त्यांच्या आणि सिमोनच्या मुलाचे नाव नोएल टाटा आहे.