भारताच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे चीन सरकारने आज स्पष्ट केले, तसेच पूर्ण अभ्यास करून आणि शास्त्रज्ञ व अभ्यासकांबरोबर चर्चा केल्यानंतरच या प्रकल्पाचे नियोजन केले असल्याने भारत आणि बांगलादेश या देशांवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही चीनने दिली आहे. चीननंतर भारत आणि बांगलादेश या देशांमधून ब्रह्मपुत्रा नदी वाहते.
तिबेटमध्ये हिमालय पर्वतरांगेमध्ये चीन यारलुंग त्सांग्पो (ब्रह्मपुत्रेचे तिवेटी नाव) नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. यासाठी या नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधले जाणार आहे. धरणाचे नियोजित स्थान भूकंपप्रवण क्षेत्रात आहे. या प्रकल्पासाठी एकूण १३७ अब्ज डॉलर खर्च होणार आहे. या प्रकल्पाला भारत आणि बांगलादेशला फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
त्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. "या प्रकल्पाचे नियोजन करताना वैज्ञानिक पद्धतीने परीक्षण करण्यात आले आहे. पर्यावरण, भौगोलिक स्थिती, जलस्त्रोत यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, नदीच्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रकल्पाची मदत होईल आणि नैसर्गिक आपत्ती टाळता येईल," असा दावा चीनने केला आहे.
भारताची अमेरिकेबरोबर चर्चा
चीनने मागील महिन्यात हिमालयाच्या पर्वतरांगेतील एका मोठ्या दरीमध्ये धरण बांधण्याच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केले आहे. या धरणामुळे ब्रह्मपुत्रेचा तिबेटमधील प्रवाह बदलणार आहे. ती एक मोठा वळसा घेऊन नंतर अरुणाचल प्रदेश आणि बांगलादेशातून वाहणार आहे. हे धरण बांधताना भारत आणि बांगलादेशला फटका बसणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन भारताने केले आहे. तसेच, या प्रकल्पाबाबतच्या घडामोडींवर आमची नजर असून पाण्याबाबतच्या आमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करू, असेही भारताने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांच्या आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात झालेल्या चर्चेतही चीनच्या धरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता.