तुरुंगातून निवडणूक जिंकलेला काश्मिरी खासदार घेणार शपथ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या राशिद इंजिनिअर यांना खासदारकीची शपथ घेण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) परवानगी दिली आहे. दहशतवादासाठी आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी २०१९ पासून इंजिनिअर हे दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत. पाच जुलै रोजी ते खासदारकीची शपथ घेऊ शकतात, असे एनआयएकडून सोमवारी सांगण्यात आले.

शपथ घेण्यासाठी इंजिनिअर यांना तुरुंगाबाहेर आणले जाणार आहे, मात्र त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही, असे ‘एनआयए’कडून स्पष्ट करण्यात आले. इंजिनिअर यांना अंतरिम जामीन देण्याबाबत पटियाला हाऊस न्यायालय मंगळवारी आदेश जारी करणार असल्याचे समजते. राशिद इंजिनिअर तसेच खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग या दोघांनी तुरुंगात राहून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

राशिद इंजिनिअर यांनी या आधी दोनवेळा लंगेट विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र तुरुंगात असूनही त्यांनी बारामुल्ला मधून विजय मिळवला. इंजिनिअर यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला तसेच सज्जाद गनी लोन यांना पछाडत विजय प्राप्त केला आहे. इंजिनिअर यांना ४५.७० टक्के तर अब्दुल्ला यांना २५.९५ टक्के मते मिळाली होती.