प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात अशा अनेक घोषणा दिल्या आहेत, ज्या लोकांच्या ओठांवर कायम राहिल्या. त्यांच्या काही नाऱ्यांनी तर अभियानाचं स्वरुप धारण केलं आणि त्यामुळे देशात सकारामत्क बदल झाला. याचं सत्राचा भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी रविवारी आपल्या मन की बात या रेडियो कार्यक्रमात आणखी एक नविन नारा दिला आहे. त्यातून त्यांनी लोकांना विशेष आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आधी देशाच्या वीर शहिदांना सन्मान देण्यासाठी 'मेरी माटी,मेरा देश' अभियान चालवले जाणार आहे. या अभियाना अंतर्गत आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशाच्या लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील.
'मन की बात'या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री मोदींनी विस्तृतपणे या अभियानाची माहिती दिली आणि म्हणाले की या अभियानाअंतर्गत देशभरात अमृत कलश यात्रा देखील काढली जाईल. देशातील प्रत्येक गावातून आणि कानाकोपऱ्यातून ७५०० मातीच्या कलशांमध्ये माती घेऊन ही अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्ली येथे पोहोचेल.
ही यात्रा देशाच्या वेगवेगळ्या भागातून रोपटे देखील घेऊन येतील. ७५०० कलशमध्ये आणलेल्या माती आणि रोपट्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे 'अमृत वाटिका' निर्माण केली जाणार आहे. ही अमृत वाटिका 'एक भारत-श्रेष्ठ भारत'या अभियानाचं प्रतिक बनेल.
पुढे मोदी म्हणाले की,"मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरुन पुढच्या २५ वर्षांच्या अमृत काळासाठी 'पंचप्राणा'ची गोष्ट बोलली होती. 'मेरी माटी मेरा देश 'या अभियानात सहभाग घेऊन आपण पंच प्राण पूर्ण करण्याची शपथ देखील घेऊ. तुम्ही सर्वांनी आपल्या देशाच्या पवित्र माती हातात घेऊन सेल्फी yuva.gov.in या संकेत स्थळावर अपलोड करा."
मोदींनी याआधी देखील अनेक घोषणा दिल्या, ज्यांनी नंतर अभियानाचं रुप धारण केलं. यामध्ये हर घर तिरंगा, दिया जलाओ कार्यक्रम,स्वच्छ भारत अभियान , वोकल फॉर लोकल आणि सेल्फी विथ डॉटर या अभियानांचा समावेश आहे.