गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३१ नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
या कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसरात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान सुरु आहे. विविध सुरक्षा दलांमधील जवानांचे संयुक्त पथक काल (दि.९) सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये शोधमोहीम राबवीत असतानाच नक्षलवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली, अशी माहिती बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जिल्हा राखीव दलाचा एक आणि विशेष कृती दलाचा एक, असे दोन जवान हुतात्मा झाले. अन्य दोन जवान जखमी झाले. या जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्रांचा आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. यामध्ये एके-४७ रायफल, इन्सास रायफल, एसएलआर, .३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लाँचर यांचा समावेश आहे.
या कारवाईत जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, बस्तर फायटर्स आणि राज्य पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीनंतर काही नक्षलवादी पळून गेले असण्याची शक्यता गृहित धरून अतिरिक्त कुमक मागवून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया...
या नक्षल विरोधी कारवाईवर राज्यसह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे."
ते पुढे म्हणतात, "आज आपण मानवता विरोधी नक्षलवाद संपवताना आपले दोन शूर सैनिक गमावले आहेत. हा देश या वीरांचा सदैव ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. दरम्यान, 31 मार्च 2026 पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही."