छत्तीसगडमधील बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाभागात चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा जवानांना १२ नक्षलवाद्यांना मारण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील सीमाभागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. ६ जानेवारीला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडवले होते. यात ९ जवान शहीद झाले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून १२ जानेवारीला ५ नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर आज आणखी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात बिजापूर व सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर ही चकमक झाली. ‘डीआरजी’ पथकाच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून नक्षलविरोधी कारवाई करत आहे. आयजी पी सुंदरराज यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे. नक्षलविरोधी मोहिमेत जवळपास ५०-७० जवनांचा सहभाग आहे. याविषयी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणतात, “दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही चकमक झाली. परवा संध्याकाळपर्यंत गोळीबार सुरूच होता. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.”
पुढे ते म्हणतात, “ प्राथमिक माहितीनुसार चकमकीत १२ नक्षलवादी मारले गेले. या भागात शोधमोहीम सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत राज्यात विविध चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. १२ जानेवारीला माडेड पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच माओवादी ठार झाले होते. गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी राज्यात वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार केले होते.”
दोन कमांडो जखमी
या चकमकीदरम्यान गुरुवारी बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणले. या स्फोटात सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो पथकातील दोन कमांडो जखमी झाले आहेत.
याविषयी पोलिसांनी सांगितले, “ही घटना बासागुडा ठाणे क्षेत्रात घडली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गस्तीसाठी या क्षेत्रात निघाले होते. यात सीआरपीएफची २२९ वी बटालियन व सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील जवान सामील होते. हे जवान चुकीने आयईडीच्या संपर्कात आले. त्यामुळे त्याचा स्फोट झाला. यात दोन जण जखमी झाले.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter